Breaking News

ना टिळक, ना रंगारी, ’यांनी’ साजरा केला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव !

सोलापूर, दि. 28, ऑगस्ट - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्याची प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाची हाक दिली. त्या सोलापूरच्या मानाच्या आजोबा  गणपतीने ख-या अर्थाने महाराष्ट्रात आणि पर्यायाने देशात सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना 1885 साली रोवल्याचा दावा या मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर मागील काही दिवसांपासून पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे संस्थापक कोण यावरून वाद सुरू आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  यांच्यापूर्वी भाऊ रंगारी यांनी हा उत्सव सुरू केल्याची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या माहितीवरून चांगलेच रान माजलेले असताना आता  सोलापूरचा मानाचा म्हणून ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाची ओळख आहे, अशा मानाच्या आजोबा गणपतीची टिळक असो देत किंवा रंगारी यांच्या गणेशोत्सवापूर्वी  तब्बल 7 वर्षे आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर शहरातील जुन्या पिढीतील मल्लिकार्जुन कांबळे, महालिंगाप्पा वजीरकर, मलिकार्जुनप्पा शेटे, संगनबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर, देशमुख, गणेचारी,  काटकर, म्हमाने, ओनामे, दर्गोपाटील, शिरगिरी, नंद्याल, आवटे आदींनी सन 1885 साली येथील शेटेवाड्यासमोर असलेल्या मोकळ्या जागेत सार्वजनिक आजोबा  गणपतीची स्थापना केली होती.
यानंतर सन 1892 साली ज्यावेळी लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे सोलापूर येथील आपले सहकारी आप्पासाहेब वारद यांच्याकडे मुक्कामासाठी आले होते. त्यावेळी  स्वतः टिळक यांनी या मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या पानसुपारी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांची गर्दी पाहून  स्वतः टिळक यांनी अशा प्रकारे गणेशोत्सव सर्वत्र साजरा केल्यास लोक एकत्र येतील अशी संकल्पना मांडली होती. त्यानंतर 1893 ला केसरीमध्ये अग्रलेखाच्या  माध्यमातून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात कृतीत आणली होती. 1885 साली सुरू झालेला सोलापूरचा आजोबा गणपती यावर्षी 132  वे वर्ष साजरा करत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरच्या आजोबा गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा पहिला मान  असल्याचे मंडळाचे ट्रस्टी व प्रसिद्धी प्रमुख सिद्धारुद्ध निंबाळे यांनी सांगितले आहे.