Breaking News

चांदोली धरण भरले, दक्षिण महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्‍न संपला

सांगली, दि. 29, ऑगस्ट - गतवर्षीपेक्षा यंदा मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असतानाही गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने चांदोली धरण 100 टक्के भरले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यामुळे संपुष्टात आला आहे. 
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा पावसाचा आगार म्हणून ओळखला जातो. यावर्षी तुलनेने यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही पाच दिवस आधीच हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. 35 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणातून सध्या पाच हजार 870 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे वारणा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी दि. 2 सप्टेंबर रोजी वारणा धरण 100 टक्के भरले होते. चांदोलीत गतवर्षी 2531 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदा केवळ 1797 मिलीमीटर इतका पाऊस झाला असूनदेखील प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाच दिवस आधीच हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने धरण पातळी नियंत्रणासाठी दि. 5 ऑगस्ट रोजीच सांडव्यामार्गे पाच हजार 870 क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. तसेच वीज निर्मितीचा मार्ग 1522 असा एकूण सात हजार 392 क्युसेस पाणी वारणेत सोडण्यात आल्याने काही प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी मात्र चांदोली परिसरात पावसाने कमी नोंद केल्याने यंदा कोणतीही पूर हानी झालेली नाही. तरीदेखील धरण 100 टक्के भरले आहे.