Breaking News

राज्यभरात मुसळधार, नाशिकमध्ये गोदावरीला पूर

मुंबई, दि. 29, ऑगस्ट - मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस सुरू असून मुंबईत नागरिकांना घरा बाहरे पडणेही अवघड झाले आहे. पावसाने झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. तर पश्‍चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सर्व लहान आणि मध्यम प्रकल्प भरले आहेत. विदर्भात नागपूर, अकोला, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे.
मराठवाड्यात देखील सर्व जिल्ह्यात गेले 4 दिवस पाऊस सुरु आहे. बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आहे. सर्व लहान आणि मध्य प्रकल्प पाण्याने भरले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस आहे. या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तर सर्व धरणं भरली आहेत. गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोकणालाही पावसाने झोडपलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.