Breaking News

अवयवदान मोहिमेविषयी गाव पातळीवर जागृती करणार - गिरीश महाजन

मुंबई, दि. 24, ऑगस्ट - देशभरात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळत आहे. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यासाठी आता 29 व 30 ऑगस्ट  रोजी राज्यस्तरीय महा अवयवदान अभियान हाती घेण्यात आले आहे. 29 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन गावात करण्यात येणार आहे. याद्वारे गावागावात  अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.
अवयवदानात गेल्यावर्षी भारतातून महाराष्ट्र राज्य दुसर्‍या क्रमांकावर होते. यावर्षी राज्यात या विषयी जाणीव जागृती केल्यामुळे अवयव दात्यांची संख्या 41 वरुन  131 पर्यंत गेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगदान अभियानास महोत्सव स्वरुपात साजरे करण्याचे मन की बात या कार्यक्रमात सूचित केले आहे. त्यानुसार  30 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील प्रत्येक घरांसमोर स्वच्छता करुन अवयवदानाबाबतची रांगोळी काढण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. अवयवदानासाठी  जिल्हा तथा तालुकास्तरावर मानवी साखळ्यांद्वारे अवयवदानाविषयी जागृती करण्यात येणार असून या अवयवदान चळवळीत लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन  त्यांनी केले.