Breaking News

बळीराजा मोबाईल अ‍ॅपचे 30 ऑगस्टला लोकार्पण

सांगली, दि. 24, ऑगस्ट - आधुनिक शेतीसह उत्पादन वाढविण्यासाठी शेतक-यांना शेतीविषयक माहिती देणा-या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने  सुरू करण्यात येणा-या बळीराजा मोबाईल अ‍ॅप सुविधेचे 30 ऑगस्टपासून लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी  दिली. याशिवाय ऑनलाईन मार्केटिंग व विष्णुअण्णा पाटील फळ बाजारातील ’वॉटर एटीएम’चा शुभारंभही त्याच दिवशी केला जाणार आहे.
बाजार समितीच्या वतीने शेतकरी हितासाठी सुरू करण्यात येणा-या बळीराजा मोबाईल अ‍ॅप व ऑनलाईन मार्केटिंग उदघाटनासाठी प्रमुख पाहुण्यांची वेळ मिळत  नसल्याने गेली महिनाभर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता विधीमंडळ अधिवेशन संपल्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्या तारखा निश्‍चित झाल्याने अखेर या  उदघाटनासाठी 30 ऑगस्टचा मुहुर्त अंतिम करण्यात आला आहे. याशिवाय फळ बाजारात ’वॉटर एटीएम’ही बसविण्यात आल्याने या तीनही सेवांचे लोकार्पण एकाच  दिवशी केले जाणार आहे.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम यांच्याहस्ते या सेवांचे लोकार्पण केले जाणार आहे. या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम, खासदार राजू शेट्टी, आमदार मोहनराव कदम व माजी राज्यमंत्री अजित घोरपडे आदी  उपस्थित राहणार आहेत. शेतकर्यांना माहिती तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यासाठी महत्त्वाचे साधन म्हणून बाजार समितीच्यावतीने बळीराजा मोबाईल ऍप सुरू  करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा शेतकर्यांना मोठा लाभ होणार आहे, असा विश्‍वासही प्रशांत शेजाळ यांनी व्यक्त केला.