Breaking News

शिर्डी विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण

मुंबई, दि. 24, ऑगस्ट - शिर्डी येथील शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट या विमानतळाचे श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच श्री साईबाबा  आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
ऑक्टोबर-2017 पासून श्री साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व सुरु होणार आहे. त्यादृष्टीने येणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेता हे विमानतळ लवकरच सुरु  करण्याचे नियोजन आहे. या विमानतळाच्या नामकरणाचा ठराव श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था यांनी करुन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाठवला.  हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विमानतळांच्या नावात बदल करण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित येते. नागपूर येथील येत्या  हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शिफारशीसह हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार  आहे.
शिर्डी (जि. अहमदनगर) येथे श्री साईबाबा समाधी दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येतात. भाविकांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र विमानतळ  विकास कंपनी (चअऊउ) ने शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट हे विमानतळ उभारले आहे. याठिकाणी सुमारे 2 हजार 700 चौरस मीटर क्षेत्रफळाची टर्मिनल  इमारत उभारण्यात आली असून प्रवाशांचे आगमन, निर्गमन, सुरक्षा, तपासणी,नियंत्रण कक्ष, एक्सरे संयंत्र इत्यादी व्यवस्था आहे. श्री साईबाबा संस्थानने या  विमानतळाच्या उभारणीसाठी दिलेल्या 50 कोटी रुपयांचा निधीतून धावपट्टी, टॅक्सी वे, टर्मिनल इमारत, पायाभूत सुविधा,संरक्षक भिंत इत्यादी कामे करण्यात आली  आहेत.