Breaking News

सुप्रीम कोर्टाकडून बीसीसीआय सचिवांना कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती लोढा  समितीच्या शिफारशी बीसीसीआयनं अजूनही का लागू केल्या नाहीत, याचं स्पष्टीकरण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं चौधरी यांना दिले आहेत. सदर स्पष्टीकरण  देण्यासाठी चौधरी यांना 19 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 2013 मध्ये आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट  फिक्सिंगची प्रकरणं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या मुदगल समितीने ऑगस्ट 2014 मध्ये सुप्रीम  कोर्टाला आपला अहवाल सादर केला. जानेवारी 2015 मध्ये बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणि बदल घडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने माजी मुख्य न्यायाधीश आर  एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. लोढा समितीने जानेवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाला आपला 159 पानांचा अहवाल सादर केला.  यामध्ये लोढा समितीने 10 शिफारसी केल्या आहेत.