Breaking News

घरफोडी उघड; मेहकर पोलिसांची यशस्वी कामगिरी

बुलडाणा, दि. 24 - येथील व्यापारी शेख इम्रान शेख गफूर हे 16 ऑगस्ट रोजी नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांना शेजार्‍यांनी  कळविले होते. त्यानंतर त्यांनी मेहकर पोलिस स्टेशनला 17 ऑगस्ट रोजी फिर्याद  दिली की, त्यांच्या घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण 3 लाख 55  हजार रुपयांचे ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटला. त्यांच्या फिर्यादीवरुन मेहकर पोलिसांनी अप.क्र. 255/17 कलम 457, 380 भादंवि हा गुन्हा दाखल करुन तपास  कार्य सुरु केले. 
मा.उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्‍वर वेंजने व पोलिस निरीक्षक मोतीचंद राठोड यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळाला भेट देवून पुढील तपासाचे सूत्र  सपोनि गौरीशंकर पाबळे यांच्याकडे देण्यात आले. मा.उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्‍वर वेंजने यांच्या मार्गदर्शनात पो.स्टे.चे एक तपासपथक तयार करण्यात  आले. सदर तपास पथकाने गतीमान सूत्रे फिरवून गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारावर मेहकर येथील शेख सलमान शेख शमीम वय-28 वर्ष, उमेरखान  दोस्त मेहमद खान वय-22 वर्ष, मोईन करामत खान, सुलतान शहा मंजूर शहा वय-25 सर्व रा.मेहकर यांना ताब्यात घेतले व त्यांना विचारपूस  केली असता  त्यांनी सदर चोरी केल्याचे मान्य केले. तसेच त्यांच्यासोबत इतर दोन आरोपींचे नाव देखील निष्पन्न झाले. सदर आरोपींकडून फिर्यादी यांचा चोरी गेलेला मुद्देमाल  पैकी, रोख 25 हजार रुपये, एक पंचवीस ग्रॅम वजनाचा राणी हार, एक तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी व चांदीची अंगठी असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा  मुद्देमाल व आरोपींनी कुलूप तोडण्यासाठी वापरलेले हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. सदर कारवाई मा.पोलिस अधिक्षक शशीकुमार मीना, मा.अपर पोलिस  अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्‍वर वेंजने, पोलिस निरीक्षक मोतीचंद राठोड यांचे मार्गदर्शनात सपोनि गौरीशंकर पाबळे, पोना शरद  गिरी, पोना अतुल पवार, पोना उमेश घुगे, पोशि अनिल काकडे या पथकाने केली आहे. या यशस्वी तपासाबद्दल सदर तपास पथकाचे अभिनंदन होत आहे.