Breaking News

डोकलाममधून सैन्य माघारी घेण्यावर चीन सहमत

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - डोकलाम भागातून चीन आणि भारताने आपापले सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शवल्याने या वादावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा  निघाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही महिती देण्यात आली. डोकलाम परिसरातील चीन सैन्याने सुरू केलेल्या बांधकामामुळे भारत आणि चीनमध्ये दोन  महिन्यांपासून वाद सुरू आहे. 
त्यामुळे या वादासंदर्भात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनशी केलेल्या द्विपक्षीय चर्चेला यश आल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर  दोन्ही देशांकडून सैन्य मागे घेण्यास सुरूवात करण्यात आली असल्याचेही सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी चीन दौर्‍यापूर्वी हा निर्णय  झाल्याने दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत.
डोकलाम परिसरातील वर्चस्वावरुन भारत आणि चीनमध्ये जून महिन्यापासून वाद आहे. डोकलाम परिसर भूतानमध्ये असल्याने भारताचा त्याच्याशी थेट संबंध नाही,  असे चीनचे मत आहे. तर, भारत आणि भूतान यांच्यात संरक्षण करार झाला असून त्यानुसार भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे, असे भारताने  सांगितले. त्यामुळे हा वाद पेटला होता. मात्र आता हा वाद शमण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, भारताने सैन्य मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण चीनचे सैन्य अजूनही त्या परिसरात गस्त घालणार आहे, असे चीनकडून सांगण्यात येत असल्याची  सूत्रांची माहिती आहे.