जीएसटीमुळे महागाईच्या दरात घट होण्यास मदत झाली - उर्जित पटेल
नवी दिल्ली, दि. 03, ऑगस्ट - वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये महागाईच्या दरात घट होण्यास मदत झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज सांगितले. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील पतनिर्धारण समितीने द्वैमासिक पतधोरणाचा आढावा जाहीर करताना रेपो दरात पाव टक्क्याने कपात करून तो 6.25 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर 5.75 टक्क्यांवर आणला. या निर्णयांमुळे कर्जावरील व्याजाच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा लाभ ग्राहकांना कधी आणि किती प्रमाणात द्यायचा याबाबचा निर्णय बँकांना घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.3 टक्क्यांवर स्थिर राहिला असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. मात्र, ही स्थिती किती काळ टिकून राहील आणि याचा आर्थिक धोरणांच्या दृष्टीने कितपत फायदा होईल याबाबत अद्यापही साशंकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.
