Breaking News

डॉलरच्या तुलनेत रूपया गेल्या दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली, दि. 03, ऑगस्ट - भारतीय रूपयाने डॉलरच्या तुलनेत बुधवारी विक्रमी कामगिरी करत गेल्या दोन वर्षातील उच्चांकी पातळी आज गाठली. आज रूपयाचे  मूल्य डॉलरच्या तुलनेत 63.73 रूपये इतके झाले. काल रूपया एका डॉलरमागे 64.07 रूपयांवर बंद झाला होता. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रूपया हे सर्वोत्तम  कामगिरी करणारे चलन ठरत आहे, असे मत विनिमय बाजारातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया सहा टक्क्यांनी वधारला आहे.
शेअर बाजार आणि रोखे बाजारातील परदेशी गुंतवणुकीत झालेली वाढ हे यामागचे एक कारण आहे. या महिन्यात भारतीय चलन विनीमय बाजारात 30 अब्ज  डॉलर्सची गुंतवणूक झाली. या गुंतवणुकीमुळे शेअर बाजाराने नवनवे उच्चांक गाठले. या महिन्यात राष्ट्रीय शेअर बाजाराने 23 टक्क्यांच्या वाढीसह आशियात सर्वात  चांगली कामगिरी केली आहे. चालू तूटीत होणारी घट आणि आर्थिक विकास दर वाढण्याच्या शक्यतेमुळे रूपया चांगली कामगिरी करत आहे.