स्वातंत्र्यदिनानंतर पोळ्याच्या दिवशीही उपोषणकर्ते न्यायाच्या प्रतिक्षेत!
गेंड्याची कातडी असणारे लोकप्रतिनिधींसह अधिकारी,कर्मचारी मात्र पुरणपोळ्या खाण्यात व्यस्त
बुलडाणा, दि. 21 - सर्वसामान्य जनतेला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे आपल्या मागण्या योग्य वेळी पूर्ण व्हाव्यात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंदखेड राजा तालुक्यातील उमनगाव येथील प्रकल्पग्रस्त माणिक खिल्लारे, मेहकर तालुक्यातील अंजनी बु.येथील सामाधान पदमने, चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील दिपक साळवे, मोताळा तालुक्यातील कोथळी येथील हानिफ खान बिलन खान हे 14 ऑगस्ट 2017 पासून चिंब पावसात आपल्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी उपाशीपोटी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याकडे मात्र प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून गेंड्याची कातडी असणारे लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचारी मात्र पोळा सणाच्या सुट्या एंजॉय करत पुरणपोळीचा आस्वाद घेत असल्याचे विदारक सत्य पुढे येत आहे.अंजनी बु.येथील समाधान पदमने यांच्या जागेच्या ग्रा.पं.प्रशासनाने आर्थिक देवाणघेवाण करुन खोटानाटे दस्तावेज बनवून त्यांची जागाच परस्पर विकल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला असून त्यांना न्याय मिळण्यासाठी आपली पत्नी व अडीच वर्षाची मुलगी आणि चार वर्षाच्या मुलासह 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. तर सिंदखेड राजा तालुक्यातील उमनगाव येथील प्रकल्पग्रस्त माणिक खिल्लारे यांची सावंगी प्रकल्पात 1989 मध्ये शेती शासनाने संपादित केली. त्यांचा प्रकल्पग्रस्त यादीनुसार 128 वा नंबर असताना त्यांच्या नंतरच्या लोकांना नोकर्या दिल्या व मला वारंवार टाळल्याचे व माझ्या नोकरीच्या वयोमर्यादेच्या नियमानुसार फक्त 3 महिने बाकी असून मी शासकीय नोकरी करण्यासाठी पात्रता धारण केली असून मला न्याय मिळावा अन्यथा मी येथेच प्राण सोडेने असेही उपोषणकर्ते खिल्लारे यांनी सांगितले.
चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील दिपक साळवे यांच्या शेतीचा गट नं.265 मधील शेतीत जातीय द्वेषातून जमीन हडपण्याच्या उद्देशाने शेताच्या मधोमध नकाशात कुठेही रस्ता नसताना गावातील रविंद्र किसन तोडकर यांनी नियमबाह्य रस्ता निर्माण केला. याबाबत संबंधित तहसिलदार यांना अनेकवेळा तक्रारी दिल्या. परंतु तोडकर यांना आर्थिक, राजकीय व जातीचे प्रबळ पाठबळ असल्याने साळवे यांना न्याय मिळाला नाही. म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. मोताळा तालुक्यातील कोथळी येथील हानिफ खान बिलन खान हे चिखली येथील लागवड अधिकारी एम.एस.मन्सुरी यांनी शासनाची दिशाभूल करुन शासनाचा निधी खर्च करुन अफरातफर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 14 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषणास बसले असून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी या न्याय मागणीसाठी त्यांचे उपोषण सुरु आहे.
या चारी उपोषणाकडे प्रशासनाने दूर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टपासून तर पोळा सणापर्यंत हे उपोषणकर्ते अन्नाचा कनही न घेता आमरण उपोषण करत आहेत. दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस येत आहे. अशा परिस्थितीतही उपोषणकर्त्यांनी आपली जागा सोडली नाही. ते आपल्या मागण्या केव्हा पूर्ण होतात या प्रतिक्षेत सणा-सुदीच्या दिवशीही बेमुदत व आमरण उपोषणास बसले आहेत. यापैकी अनेकांची तब्येत बिघडली आहे. अशक्तपणा वाढला असताना येथील गेंड्याची कातडी असलेले लोकप्रतिनिधी, प्रशासनात बसलेले अधिकारी मात्र लगातार सुट्यांचा मनसोक्त उपभोग घेत आहेत. व पुरणपोळीचा मनसोक्त आनंद घेत आहेत, अशा तिखट प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून येत आहेत.
