Breaking News

मोहर्रम मिरवणुकीदरम्यान दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी - ममता बॅनर्जी

कोलकाता, दि. 24, ऑगस्ट - मोहर्रम मिरवणुकीदरम्यान यंदाही दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनी येथे केली. दुर्गा पूजा आयोजकांबरोबर झालेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या.
विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते. कारण त्यानंतर मोहर्रम मिरवणुका निघतील. जर या दोन्ही मिवरणुका  एकमेकांसमोर आल्या, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. या प्रकरणात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. काही लोक अशा गोष्टींचा फायदा घेऊ  शकतात आणि हिंदू व मुसलमान यांच्यात वाद निर्माण करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकतात, असेही मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या.
मुहर्रमच्या दिवशी 24 तास वगळता 2, 3 व 4 ऑक्टोबर रोजी मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते, असेही बैठकीनंतर बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या.
गेल्या वर्षी अशा प्रकारे राज्य सरकारने मूर्ती विसर्जनावर बंदी घातली होती. यामुळे 11 ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त मूर्ती विसर्जन व 13 ऑक्टोबर रोजी  मुहर्रम साजरा करण्यात आला. यावर हा मनमानी निर्णय असल्याचे सांगत कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. समाजातील अल्पसंख्यांक  वर्गाला खुश करण्याचा हा राज्य सरकारचा सुस्पष्ट प्रयत्न असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले. समाजातील दोन वर्गांमध्ये तेढ निर्माण करणारा कोणताही निर्णय  केला जाऊ शकत नाही, असा आदेश न्या. दीपंकर दत्ता यांनी 6 ऑक्टोबर 2016 रोजी दिला होता.