Breaking News

व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून कलम 21 अंतर्गत (खाजगी आयुष्य जगणे) हा अधिकार येतो असा  ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या निर्णयामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड संबंधित माहिती सार्वजनिक होणार नाही. आधार कार्डसंबंधी निर्णय  स्वतंत्रपणे घेणार असल्याचे न्यायालायाकडून सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने गोपनीयतेच्या अधिकाराबाबत सर्वसंमतीने हा  महत्वपूर्ण निर्णय दिला. 
सामाजिक कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च  न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. यामध्ये आधार कार्डच्या सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होऊ शकतो, असे याचिकाकर्त्यांचे  म्हणणे होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला. 9 सदस्यांच्या खंडपीठात सरन्यायाधीश जे.एस. खेहर, न्या. जे. चेलमेश्‍वर, न्या. एस.ए  बोडबे, न्या. आर.के. अग्रवाल, न्या. आर.एफ. नरिमन, न्या. अभय मनोहर सप्रे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल आणि न्या. एस. अब्दुल नाझीर  यांचा समावेश होता.