Breaking News

नागपूरला पुढील वर्षी ‘पेंच’चे पाणी नाही! - जि.प.सभेत झाला ठराव

नागपूर, दि. 24, ऑगस्ट - नागपूरकरांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. येत्या वर्षी शहराला पेंच धरणातून पाणी मिळणार नाही असा ठराव आज, बुधवारी 23  ऑगस्ट रोजी नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. त्यामुळे पुढल्या वर्षी नागपूरला पाणी टंचाई सोसावी लागण्याची शक्यता आहे. नागपूरला  पेंच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातील बहुतांश साठा महापालिकेला होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही.
पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण शेतकरी हतबल झालेला आहे. त्यामुळे पेंच धरणातून नागपूर शहराला पाणी देऊ नका, नागपूर मनपाने आपली व्यवस्था स्वत:  करावी, अशी मागणी करीत विरोधकांनी जिल्हा परिषदेच्या सभेत गदारोळ केला. सदस्यांच्या भावना आणि शेतकर्‍यांची स्थिती पाहता जि. प. अध्यक्ष निशा सावरकर  यांनी पुढील वर्षीपासून पेंचमधील पाणी नागपूर शहराला मिळणार नाही, असा ठराव घेतला.
पेंच धरणाचे पाणी शेतीकरिता वळविण्यात यावे, याकरिता यापूर्वी अनेकदा मागणी करण्यात आली. जि. प. चे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनीही जिल्हाधिकार्‍यांकडे  पत्राद्वारे मागणी केली होती. आमसभेत पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. जि. प. सदस्य भारती गोडबोले व शोभा झाडे यांनी पेंच धरणाच्या पाण्याचा  प्रश्‍न लावून धरला. गोडबोले म्हणाल्या, पेंच प्रकल्पाचे पाणी शेतकर्‍यांना मिळत नाही. सिंचनाची व्यवस्था नाही. शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी नागपूरला दिले जाते.  धरणातील पाणी शेतीसाठी असून, ते शेतकर्‍यांना मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी गोडबोले यांनी केली. तर विरोधी पक्षांनी यासंदर्भात ठराव पारित करण्याची  मागणी केली. दरम्यान भाजपच्या वलनी येथील सदस्या छाया ढोले यांनी पाण्याच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला. ढोले विषयांतर करीत असून प्रथम हा ठराव  पारीत करण्यात यावा, अशी मागणी कुंभारे आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरली. यावरून सभागृहात बराच गदारोळ झाला. ठराव पारीत झाल्याखेरीज  दुसर्‍या मुद्यावर चर्चा होऊ देणार नाही, यावर विरोधी पक्षाचे सदस्य अडून बसले. अखेर जि.प. अध्यक्षा निशा सावरकर यांना ही मागणी मान्य करीत ठराव पारीत  करण्याची घोषणा करावी लागली. हा ठराव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.