Breaking News

पणजी पोटनिवडणूक चुरशीची, पर्रिकरांविरोधात सेनेकडून नाईक?

पणजी, दि. 03, ऑगस्ट - गोव्यात येत्या 23 ऑगस्ट रोजी पणजी आणि वाळपईत पोटनिवडणूक आहे. यात पणजीतून मनोहर पर्रिकर निवडणूक लढवत आहेत.  त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. विशेष म्हणजे पर्रिकरांविरोधात शिवसेनेकडून माजी महापौर अशोक नाईक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
माजी महापौर अशोक नाईक यांनी काँग्रेसची उमेदवारी धुडकावून लावली आहे. शिवाय, त्यांनी शिवसेनेसोबत संपर्क साधल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नाईकांची  मनधरणी करुन पर्रिकरांविरोधात पणजीतून त्यांना रिंगणात उतरवता येईल का, याची चाचपणी शिवसेनेने सुरु केली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने गोवा सुरक्षा मंच आणि मगो यांच्याशी महाआघाडी करुन निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेला कंटाळून गोवा सुरक्षा मंचाने  पक्षाध्यक्ष आनंद शिरोडकर यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. अशावेळी या मतविभागणीचा फायदा भाजपला होऊ नये म्हणून शिवसेनेने संघाचे बंडखोर आणि गोवा  सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. याबाबतही शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत लवकरच गोव्यात येऊन अंतिम  निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.