Breaking News

प्रत्येकात देव शोधल्यास जीवन सुखी होईल- हभप जगन्नाथ महाराज

अखंड़ हरीनाम सप्ताहाची उत्साहात सांगता 

संगमनेऱ, दि. 24, ऑगस्ट - देवाने  अडचणीला साधन बनविले. जीवनात संधी एकदाच येते किंबहुना ती निर्माण करावी लागते. परमार्थ एकटायाने करावा व  न्याय  पाच जणांनी दयावा, मिळालेले जीवन देवाचा प्रसाद समजावा  त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा. प्रत्येकात देव शोधून आनंदाने भेटा, म्हणजे जीवन सुखकर होईल,  असे प्रतिपादन ह.भ.प.जगन्नाथ महाराज यांनी केले.
तालुक्यातील सुकेवाड़ी खांजापुरकरांच्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता सोहळयास उपस्थित भाविकांना संबोधित करताना काल्याच्या किर्तनात ते बोलत होते.  प्रारंभी ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानेश्‍वरी ग्रंथाची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेउन महिला मोठ्या प्रमाणात सहभागी  झाल्या. ज्ञानोबा-तुकारामांच्या भजनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला.  यावेळी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संगमनेर शहराचे पोलिस  उपनिरीक्षक ओमासे, महाराष्ट्र तमाशाभूषण रघुवीर खेड़कर आदी उपस्थित होते. येथील भाऊसाहेब कुटे यांच्या मातोश्री गं. भा. सिताबाई दामोधर कुटे यांच्या  स्मरणार्थ ज्ञानेश्‍वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले. रघुवीर खेड़कर म्हणाले, की तमाशा व किर्तन या दोन परस्परविरुद्ध  टोकाच्या बाजू आहेत. किर्तनाचा श्रोतावर्ग  चिंतन करणारा असतो. त्यामुळे या व्यासपीठावर अध्यात्मपर चितंन करावे लागते. गावात सर्वांनी हरिपाठ करणे आवश्यक आहे. या नामसप्ताहात महिला  किर्तनकारांच्या उपस्थितीने महिलांमध्ये उत्साह दिसत होता.
या हरिनाम सप्ताहात प.पू. शिवदास महाराज, जनकगिरी महाराज. ह.भ.प.कवड़े महाराज, कोबारणे महाराज, अंबादास महाराज, दुध संघाचे संचालक लक्ष्मणराव  कुटे, जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊसाहेब कुटे, केशवराव जाधव आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी  ग्रामपंचायत सद्स्य देवराम शेटे, सुभाष कुटे, दादासाहेब कुटे, विषाल गोसावी भरत सातपुते, अरुण शेटे, संतोष कुटे, जगन्नाथ कोटकर, अरुण सातपुते, दिलीप  सातपुते, शंकर सातपुते, विलास कुटे, बबन शिंदे, भाऊराव कुटे आदींनी पुढाकार घेतला. यासाठी जिल्हा परिषदेचे सद्स्य भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे यांचे  मार्गदर्शन लाभले.