Breaking News

चौदाव्या वित्त आयोगाचा निधी गेला गटारात!

जवळ्याच्या कारभार्‍यांची संतापजनक मनमानी
ड्रेनेजचे काम निकृष्ट दर्जाचे; रस्त्यावर साचते दूषित पाणी  

जवळा़, दि. 24, ऑगस्ट - ग्रामपंचायतस्तरावर विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारने 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला भरघोस दिला आहे.  या पार्श्‍वभूमीवर जवळा ग्रामपंचायती ’आमचं गाव आमचा विकास’ हा कार्यक्रम हाती घेऊन 14 व्या वित्त आयोगाचा आराखडा गावातून फेरी काढून मोठा गाजावाजा  करीत तयार केला. चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु, गावच्या कारभार्‍यांनी मनमानी  करीत ड्रेनेजची अत्यंत निकृष्ट पद्धतीने कामे करून ग्रामस्थांना रोगराईच्या खाईत ढकलून देण्याचे पाप चालविले आहे. यामुळे अंडरग्राउंड ड्रेनेजचे दूषित आणि  दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत असून 14 व्या वित्त आयोगाचा गटारात वाहून गेल्याची तक्रार संतप्त ग्रामस्थांमधून केली जात आहे.  
पण नागरिकांची अपेक्षा भंग करण्याचं काम ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी केले.
14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जवळा गावात अंडरग्राउंड गटारीचे लाखों रुपयांचे काम करण्यात आले. यामध्ये गावातील माळीगल्ली, लेकुरवाळेगल्ली, धनगरवाडा,  वडारवाडा, मेहेरगल्ली, पाटीलगल्ली आदी ठिकाणी अंडर ग्राउंड गटारी करण्यात आल्या. मात्र मलिदा खाण्याच्या नादात सर्व नियम धाब्यावर ठेवण्यात  हे काम  करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. हे काम करताना जुन्याचं गटारीत पाईपलाईन करण्यात आली. पाईप बुजविण्यासाठी मुरूम किंवा माती  वापरण्यात आली नाही. काही ठिकाणी ग्रामस्थांचे पाईपच जोडन्याय आलेले नाहीत. काही ठिकाणी पाईप पुरण्यात आलेले नाहीत. अनेक ठिकाणच्या चेंबरला  झाकणंच बसविण्यात आली नाहीत. तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे वाळू व सिमेंट वापरलेल्यामुळे ड्रेनेजची झाकणे खराब झाली आहेत. चेंबर सुरु होण्याआधीच  ब्लॉक झाले आहेत. त्यामुळे गटारीचे व संडासाचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या परिसरात घाण व दुर्गंधीमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न  निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामपंचायतच्या मनमानी पदाधिकार्‍यांच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचा  भोंगळ कारभार जवळा गावात सुरु आहे.