Breaking News

समाजशोषित व्यवस्थेला वेसण घालायची कुणी...?

दि. 29, ऑगस्ट - बाबा रहीमला दहा वर्षाची सजा सुनावून न्याय व्यवस्थेने आपले काम चोख बजावले आहे. मात्र सजा सुनावली म्हणून काम संपले नाही. ही  जातकुळी नष्ट झाली नाही. रामरहीम एक प्रवृत्ती आहे. देशाच्या प्रत्येक गावात ती पोसली जाते आहे. त्यांचा तो धंदा आहे. खरे दोषी असलेल्या व्यवस्थेला रफासावर  लटकवले जात नाही तोपर्यंत या प्रवृत्ती समाजाचे रक्तपित राहाणार.
समाजाने विवेकता दांभिकतेच्या चरणी अर्पण केली आहे असा आरोप सर्रासपणे करून एक मोठा घटक आपली जबाबदारी झटकत आहे. खरे तर कुणी एक दांभिक  आहे, आणि आपण तेव्हढे विवेकी आहोत असा दावा करण्याचा अधिकार फार थोड्या मंडळींना आहे किंबहूना अशा महानुभवांना शोधणे म्हणजे सागरातून मोती  शोधण्यापेक्षा कठीण आहे. याचाच अर्थ समाजात बोकाळलेल्या बाबागीरीला आणि बाबागीरीच्या जंजाळात फसलेल्या समाजाला केवळ दोषी ठरवून चालणार नाही तर  एकुण समाजव्यवस्थेचे शुध्दीकरण करणे ही काळाची अपरिहार्यता आहे. समाजव्यवस्थेचे शुध्दीकरण करीत असतांना राजकीय, सामाजिक, न्यायीक, प्रशासकीय  आणि माध्यम व्यवस्थेने परस्परपुरक भुमिका घेणेही तितकेच महत्वाचे आहे. सच्चा सौदा डेरा प्रकरणाच्या निमित्ताने बुवा भोंदूगीरी पुन्हा चर्चेत आली आहे. मुळात या  प्रवृत्तींना जन्माला कोण घालते, पोसते कोण, आणि त्यांचे उदात्तीकरण कोण करते या प्रश्‍नांची उत्तरे तांञिक चंद्रास्वामी ते बाबा राम रहीम पर्यंतच्या तमाम  देवदूतांच्या सर्वच क्षेञातील अनुयायांकडे आहेत. देशाचे चालक मालक सारेच या बाबांचे मुत्रही तिर्थ म्हणून प्राशन करू लागले तर भोळ्या भाबड्यांच्या निष्पाप  श्रध्देला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा अधिकार कुणालाही नाही. बाबा राम रहीमच्या प्रकरणाने सारी यंत्रणा हरियाना स्थित सिरसा वर सगळ्यांच्याच नजरा  केंद्रीत झाल्या आहेत. महाराष्ट्रातील पुरोगामी मंडळीही सिरसा वर आपली विद्वत्ता पाजळून विवेकी चेहरा उजागर करण्याचा खटाटोप करीत आहे. प्रतिमा उजळून  काढण्यासाठी सच्चा सौदाला लक्ष्य करण्याचा द्रविडी प्राणायम करण्याऐवजी या प्रतिभेचा वापर करण्यास महाराष्ट्रातही मोठी संधी आहे. अर्थात ही मंडळी पोखरलेल्या  व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. परिणामी अपेक्षांचे ओझे त्यांच्या खांद्यावर ठेवणे संयुक्तिक ठरणार नाही. स्वातंञ्योत्तर भारतात या बुवाबाजीला पोषक वातावरण  जाणीवपुर्वक उपलब्ध करून दिले गेले. चंद्रास्वामी, सत्यसाईबाबा, ही तत्कालीन बाबांची पिढी देशाच्या पंतप्रधानांपासून गल्लीतील कार्यकर्त्यापर्यंत, शास्रज्ञांपासून  जिपच्या शिक्षकांपर्यंत, भांडवलदार उद्योजकांपासून गावातील दुकानदारापर्यंत भक्तांची मांदीयाळी असलेल्या या क्षेत्राला कळत नकळत कार्पोरेट दर्जा मिळवून दिला  गेला. चंद्रास्वामी सत्यसाईची नवी पिढी पोसली जाऊन भक्तीच्या भांडवलावर बाबांची दुकानदारी जोमात आली. या दुकानदारीला व्यवस्था वेठीस धरलेल्या  प्रस्थापितांनी आणखी पोसले, कधी प्रेरणा, कधी काळाची गरज तर कधी मजबुरी असलेल्या जनतेने आपआपल्या नेत्यांच्या, प्रेरणास्थानांच्या पावलावर पाऊल ठेवून  बाबांचे शिष्यत्व स्वीकारले. दुःखाचा प्रतिकार करू पाहणार्‍या समाजापेक्षा अनुनय म्हणून बाबांना उर्जा देणारा हा वर्ग मोठा आहे. राजकारण्यांनी सत्तेसाठी, प्रशासनाने  आपले ईप्सीत साधण्यासाठी शक्य असूनही बाबांचा बुरखा फाडण्यात कजूंषी केली.कुणा ञस्तीताने बाबाला उघडे पाडण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला समुळ उखडून  टाकण्यासाठी ही सारी यंत्रणा हातात हात घालून काम करते. आणि म्हणूनच गावोगाव अशा भोंदूंचे करोडोचे अलिशान मठ सर्वसोयींनी युक्त निर्माण झाले. बाबा  रहीमच्या निमित्ताने या गोष्टी फक्त चर्चेत आल्या आहेत. अस्तित्व पुरातन आहे. बाबा रहीमचा बुरखा फाटला. त्याला सजाही झाली पण प्रश्‍न संपला नाही. दुकानदारी  बंद झाली नाही. समाजाचे शोषण थांबले नाही, या नराधम प्रवृत्तीला पोसणारी व्यवस्था जोपर्यंत नेस्तनाबूत केली जात नाही तोपर्यंत असे राम रहीम निपजणार,  पोसले जाणार आणि पुन्हा समाजाला गोचडीसाखे शोषणार. आणि म्हणून बाबांप्रमाणेच त्यांच्या आश्रयाला जाणार्‍या, बाबाला पोसणार्‍या व्यवस्थेतील प्रत्येकाच्या  नाकात वेसण घालावी लागणार आहे.