Breaking News

गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘सीआयडी’ समन्वयक पोलिसांची आंतरराज्यीय परिषद

नागपूर, दि. 29, ऑगस्ट - विविध राज्यातील गुन्हेगारांना नजरकैद करून गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) समन्वयकाची  भूमिका पार पाडणार आहे. नागपुरात आयोजित आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषदेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 
राज्या-राज्यातील गुन्हेगारांचे आणि गुन्हेगारीसंबंधीच्या माहितीचे आदानप्रदान करता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या पुढाकारात  नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. नागपूर येथे 28ऑगस्ट रोजी आयोजित या परिषदेला  सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल, मध्य प्रदेश राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक कैलास मकवाना, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस  महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांच्यासह ठिकठिकाणचे 30 वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. परिषदेच्या उद्घाटनानंतर पोलीस आयुक्त डॉ. के.  व्यंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेला सुरुवात झाली. आंतरराज्यीय गुन्हेगारी, शस्त्र तस्करी, अंमली पदार्थ तस्करी, मानवी तस्करी, बेपत्ता व्यक्ती, अनोळखी  मृतदेह, गुन्हेगारांची देवाणघेवाण, नक्षलवाद, फ्रंटल ऑर्गनायझेशन, जनावरांची अवैध वाहतूक आदी विषयांवर समन्वय साधन्यासाठी महत्त्वाच्या माहितीची  देवाणघेवाण करण्यात आली. सीआयडीचे कैलास मकवाना, संजीवकुमार सिंघल, जी. के. पाठक, पोलीस उपमहानिरीक्षक छिंदवाडा, इर्शाद अली पोलीस  उपमहानिरीक्षक, बालाघाट, अभिनाश कुमार डीआयजी (आयबी), सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, प्रतापसिंग पाटणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर, अंकुश  शिंदे पोलीस उपमहानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, वाहतूक शाखेचे रवींद्रसिंग परदेशी, गुन्हे शाखेचे उपायुक्त  संभाजी कदम, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त राकेश ओला, उपायुक्त राहुल माकणीकर, उपायुक्त एस. चैतन्य त्याचप्रमाणे अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  अविनाश कुमार, वर्धा येथील पोलीस अधीक्षक निर्मलादेवी, चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठक्कर, भंडारा येथील पोलीस अधीक्षक विनीता शाहू, नागपूर ग्रामीणचे  पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे, गोंदियाचे डॉ. दिलीप पाटील भुजबळ, नागपूर जीआरपीचे अधीक्षक डॉ. अमोघ गावकर, गडचिरोलीचे अतिरिक्त अधीक्षक महेंद्र  पंडित, यवतमाळचे अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, बुलडाण्याचे अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, अकोल्याचे अपर पोलीस अधीक्षक विजय सागर,  अमरावतीचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित या अधिकार्‍यांनी या परिषदेत तपास व गुन्हेगारी नियंत्रणावर प्रकाश टाकला.
या परिषदेच्या समारोपीय सत्रात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्या राज्यातील सीआयडी अन्य राज्याच्या  सीआयडी आणि पोलिसांच्या मध्ये समन्वयक म्हणून भूमिका वठविणार, असा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत ठिकठिकाणच्या 550 गुन्हेगारांच्या माहितीचे  आदानप्रदान करून त्यांना कसे नियंत्रित करायचे, त्यासंबंधाने काही निर्णय घेण्यात आलेत.
ई- तक्रारीचे आवाहन
राज्यात ई तक्रारीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत पोलीसांना आहे. आतापावेतो केवळ 330 ऑनलाईन तक्रारी आल्या आहेत. ई-तक्रार करणे फारच  सोपे आणि सोयीचे आहे. महाराष्ट पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन आपला मेल आयडी तसेच मोबाईल क्रमांक नमूद करून रजिस्ट्रेशन करणार्‍याला व्यक्तीला  कुठूनही ई तक्रार करता येते. अशी तक्रार करणार्‍यास तातडीने पोच मिळते. अनेक पोलीस ठाण्यात प्रशिक्षीत मणूष्यबळ नसल्याने हा उपक्रम गुंडाळल्यासारखा  झालाय मात्र, लवकरच उपाययोजना करून ई तक्रारीचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.