सिंधू नदीवर भारताला जलविद्यूत प्रकल्प उभारण्याची जागतिक बँकेकडून परवानगी
वॉशिंग्टन, दि. 03, ऑगस्ट - जागतिक बँकेने सिंधु जल कराराअंतर्गत भारताला सिंधू नदीवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याची परवानगी दिली आहे. सिंधु जल करारासंबंधी भारत व पाकिस्तानदरम्यानची सचिव स्तरिय चर्चा पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय बँकेकडून ही परवानगी देण्यात आली. जागतिक बँकेच्या या निर्णयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे . जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, किशनगंगा जलविद्यूत प्रकल्प व रातले जलविद्यूत प्रकल्पाच्या निर्मितीला पाकिस्तान विरोध करत आहे. भारत या प्रक्रियेत सिंधु जल करारातील नियम व अटींचे पालन करत आहे. त्यामुळे भारताला सिंधु जल करारातील अटी विचारात घेऊन प्रकल्प निर्मितीस परवानगी दिली जात आहे. किशनगंगा जलविद्यूत प्रकल्पाची निर्मिती झेलम नदीवर होणे प्रस्तावित असून रातले जलविद्यूत प्रकल्पाची निर्मिती चेनाब नदीवर होणे प्रस्तावित आहे. भारत या प्रकल्पाची निर्मिती करताना सिंधु जल कराराच्या नियमांचे पालन करत असूनही पाकिस्तानकडून या प्रकल्पास विरोध केला गेला.
