Breaking News

अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा ?

मुंबई, 30 - आपण रॉसाठी काम करत असल्याचा दावा कुलभूषण जाधवनी व्हिडिओत केला असून भारत सरकारने मात्र या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 

पाकिस्तान सरकार आणि लष्करानं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव स्वतः रॉचे एजंट असल्याची कबुली देताना दिसत आहेत. ‘मी भारतीय नौदलाचा अधिकारी असून 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार. 2002 मध्ये 14 वर्षांच्या सेवेनंतर मी गुप्त अभियान सुरु केलं. 2003 मध्ये मी इराणच्या चबाहारमध्ये एक छोटा उद्योगधंदा सुरु केला. माझ्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. 2003-04 मध्ये मी कराची दौरा केला. रॉसाठी भारतात काही काळ काम केल्यानंतर 2013 मध्ये मी रॉमध्ये सहभागी झालो.’ अशी कबुली कुलभूषण जाधव देताना दिसतात. भारत सरकारने मात्र त्या व्हिडिओची सत्यता आणि त्यात करण्यात आलेले आरोप सपशेल नाकारले आहेत. कुलभूषण हे ‘रॉ’चे एजंट नसल्याचं भारतानं ठणकावून सांगत हा सगळा प्रकार त्यांच्याकडून वदवून घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. सत्यता पडताळण्यासाठी भारतीय उच्चायुक्तांना कुलभूषण यांची भेट घेऊ देण्याची मागणी भारत सरकारतर्फे करण्यात आली आहे, मात्र पाकिस्तानने ती फेटाळून लावली आहे.  दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या मित्रांनी त्यांना परत आणण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. कुलभूषण यांच्या बालमित्रासह अनेक जणांनी त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे.