Breaking News

भारत, अमेरिका सिंधु पाणी वाटप करारात अडथळे निर्माण करत असल्याचा पाकचा आरोप

इस्लामाबाद, दि. 08, ऑगस्ट - भारत व अमेरिका कारस्थान रचून सिंधु पाणी वाटप करारात अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात  आला आहे. पाकिस्तानचे नवनिर्वाचित परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हा आरोप केला. परराष्ट्रमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतरची  आसिफ यांची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. 
पाकिस्तानविरोधातल्या अफगाणिस्तानच्या कारवायांचे भारत समर्थन करत असल्याचा दावाही त्यांनी केला. आम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असून भारत  त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचेही ते म्हणाले. शेजारील राष्ट्रांबरोबर शांततापूर्ण व चांगले संबंध निर्माण करण्याच्या आमच्या इच्छेला आमचा दुबळेपणा  समजू नये, असेही ते म्हणाले. भारताकडून प्रत्यक्ष सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोपही आसिफ यांनी केला. चिनाब व झेलम नदीवरील  जलविद्यूत प्रकल्पाला जागतिक बँकेकडून नुकतीच परवानगी देण्यात आली. त्या पार्श्‍वभूमीवर आसिफ यांनी जागतिक बँकेवर थेट आरोप न करता अमेरिकेचे नाव  घेऊन आरोप केला असल्याची शक्यता आहे.