Breaking News

मराठा मोर्चेकर्‍यांकरता शिवसेनेने केली न्याहारीची सोय...

मुंबई, 09 . ऑगस्ट - ठाणे जिल्ह्यातून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाला शिवसेनेची मदत पडद्यामागून होत होती. परंतु, आता शिवसेनेने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला थेट पाठींबा दाखवला आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येणार्‍या मराठा बांधवांसाठी सकाळी सहा वाजल्यापासून पक्षातर्फे न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर तब्बल 70 हजार मोर्चेकर्‍यांना पुरतील इतके वडापाव आणि चहाची करण्यात आली असून नवी मुंबईतील करावे येथील तांडेल मैदानावर 35 हजार थाळी कांदेपोहे मागविण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जातीने या कामात लक्ष घालत आहेत. ठाणे महापालिकेतील काही वरिष्ठ  अधिकार्‍यांनाही आवश्यक ‘रसद’ उभी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने निघणार्‍या मराठा क्रांती मोर्चासाठी तब्बल 25 लाखांहून अधिक बांधव सहभागी होतील, असा दावा  मुंबई समन्वय समितीने केला आहे. यापूर्वी राज्यभर निघालेल्या मराठा मोर्चा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता मुंबईत निघणार्‍या या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले  आहे.
राज्यात आतापर्यंत निघालेल्या मराठा मोर्च्यामध्ये सर्व पक्षातील मराठा नेते सहभागी झाले होते. परंतु, मोर्च्याला कोणतेही राजकीय पक्षाचे नाव जोडले जाऊ नये,  म्हणून मोर्चेकर्‍यांनी नेहमीच आवश्यक ती खबरदारी बाळगली होती. परंतु, यंदा शिवसेना मराठा आंदोलनात आपला सहभाग अधिक ठळकपणे दाखवत आहे.  मोर्च्यासाठी मुंबईत येणार्‍या कार्यकर्त्यांच्या न्याहारीची सोय करून शिवसेना त्यांची मने जिकंण्यासाठी सज्ज झालेली दिसत आहे.
नवी मुंबईत करावे येथील तांडेल मैदानात मोर्चेकर्‍यांसाठी कांदापोहे, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे स्थानिक नेते विजय चौगुले  यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.