Breaking News

जि.प.कर्मचारी सोसायटीत अनोखी भक्ती

। दरवर्षी विविध साहित्य वापरुन आकर्षक गणेशमूर्ती साकारण्याचा छंद

अहमदनगर, दि. 27, ऑगस्ट - नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीतील कर्मचारी संतोष हरबा दरवर्षी विविध साहित्य वापरुन आगळयावेगळया गणेशमूर्ती साकारत असतात. गेल्या 24 वर्षांपासून ते अशा मूर्ती साकारुन गणेशाची सेवा करीत आहेत. यंदा त्यांनी काचेचा वापर करून मूर्ती साकारली आहे. 
सोसायटीच्या कार्यालयात दरवर्षी हरबा यांनी साकारलेली मूर्ती गणेशोत्सवात बसवली जाते. कोरी रंगकाम न केलेली मूर्ती आणून हरबा यांनी त्यावर काचेचे काम केले. या मूर्तीच्या कामाची तयारी त्यांनी महिनाभर आधीच सुरू केली. दैनंदिन कामकाज संपल्यानंतर ते मूर्ती सजावटीच काम करत असतात. कलेचा दृष्टीकोन असलेले हरबा दरवर्षी वैविध्यपूर्ण सजावट करून मूर्ती साकारतात.
आतापर्यंत त्यांनी स्ट्रॉ, डिस्को मणी, चमकी, काडेपेटीत काड्या, कुंदन, लाकडी भुसा, कडधान्य, उपवासाचे पदार्थ, चहा पावडर, साबुदाणा, खोबर्याचा  किस, मोती, लोकरीचे धोग अशा वस्तू वापरुन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती साकारल्या आहेत. त्यांना स्टार प्लस, स्पर्धेत बक्षिसही मिळाली आहेत. इको फ्रेंडली गणेशमूर्तीसाठीही त्यांना सन 2013 मध्ये पुरस्कार मिळाला होता. गणेशाप्रती असलेली भक्ती आणि नाविन्याचा ध्यास यातून हा छंद जडल्याच हरबा यांनी सांगितले. टिकल्यांनी सजवलेली त्यांनी तयार केलेली एक मूर्ती तर त्यांच्या मित्राला त्यांनी अमेरिकेतही पाठवली होती. आपल्या छंदातून दरवर्षी नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती साकारण्याची हरबा यांची हातोटी सर्वांसाठीच कौतुकाचा विषय बनलेली आहे.