Breaking News

जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळांचा प्रश्‍न ऐरणीवर


बाळकुणाल अहिरे/नगर 
निंबोडी येथील जिल्हा परिषद प्राथामिक शाळेचे छत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हयातील मोडकळीस आलेल्या, जीर्ण झालेल्या शाळेंचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद शाळांचे होणारे निकृष्ट दर्जाचे बांधकामावर यानिमित्ताने अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरविण्यात येणार निधी बांधकामावर पूर्ण खर्च होतो का? वापरण्यात येणारे साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असते का? बांधकामानंतर अहवाल सादर करणारे, यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे, संबधित यंत्रणेला कळवत नाही का? असे अनेक प्रश्‍न शाळामध्ये होणार्‍या बांधकामावर उपस्थित होत आहे.
निंबोडी येथील घटना टाळता आली असती, मात्र गेंडयाची कातडी असलेल्या प्रशासनासह, स्थानिक लोकप्रतिनिधीनी याकडे डोळेझाक केल्यामुळेच, ही घटना रोखता आली नाही. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये फेरफटका मारल्यानंतर कळते, जिल्हा परिषद शाळांची अवस्था. अनेक शाळांमध्ये छतातील पाणी वर्गात गळत असल्याचे दिसून आले, तर कुठे छतावर पाणी साचत असून, पाणी वाहून न जाता, ते पाणी छतामध्ये झिरपत असल्याचे देखील दिसून येत होते. गावागावातील कारभारी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेत होते. तर अनेक कारभारी सांगत होते, शाळेचे नवीन बांधकाम होऊन तीन-चार वर्ष उलटले, तरी शाळा मोडकळीस
आल्याचे निदर्शनास आणून देत होते. तर अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या शाळेच्या स्थितीबाबत जिल्हा परिषदेला अवगत करण्यासाठी गावातील कारभारी निवेदने तयार करत होते. जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत उद्यांचे स्वप्न बघत असतात. मात्र त्यांच्या कळया फुलण्याआधीच, मानवनिर्मित चुकांमूळे त्यांचे आयुष्य खुडून घेतले जाते, आणि दोष मात्र निसर्गाला देऊन मोकले व्हायचे अश्याच कारभाराचा प्रत्यय सध्या येत आहे. संवेदनशीलताच हरवून बसलेल्यांना, निवेदनांचा, आंदोलनाचा अर्थ समजत नसल्यामुळेच, निवेदनाला कागदांची चिटोरे समजून केराची टोपली दाखविली जाते. आणि मग घडतात, निंबोडी सारख्या दुर्घटना. निंबोडीच्या घटनांमुळे आतातरी प्रशासन जागे होईल, आतातरी जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेतला जाईल, पर्यायी व्यवस्था उभी करण्यात येईल, अशी अपेक्षा करण्यात हरकत नाही. हा प्रश्‍न केवळ जिल्हा परिषद शाळांचाच नसून, इतर शाळांचा देखील आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाहतक करणार्‍या स्कूलबस, यांचा दर्जासोबत अनेक बाबीकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. मात्र महिना दोन महिना लोटला की सगळया घटनांचा विसर पडेल, पुन्हा नवीन घटनेची पुनरावृत्ती होण्यासाठी.