Breaking News

निंबोडी निंबोडी... मान्सून पुर्व अहवालाची अडली घोडी


तीन दिवस सुरू असलेली संततधार... शाळेचा आठवड्यातील पहिला दिवस.. घंटा वाजायला अवघे दहा मिनिटे उरलेली.. चिमणी पाखरं घराकडे परततील म्हणून आई बाबा आजी आजोबा दादा ताई सारं कुटूंब रस्त्याकडे नजर रोखून बसलेलं... धोधो सुरूच असल्याने काळजीत आणखी भर. इतक्यात शाळेवर सावली धरणारे छप्पर धाड धाड आवाज करीत कोसळू लागले. काही कळायच्या आता चिमुकली ढिगार्‍याखाली अडकली. क्षणार्धात होत्याचं नव्हत झालं. तरण्याबांड आईबापांना आपल्या कुशीत खेळणार्‍या पाखरांना तडफडताना पहाण्याचे दुर्दैव ओढवले. तीन जीव जागेवरच घेतले काळाने... 16 विद्यार्थी जखमी अवस्थेत यमाला परतविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी गावातील ही दुर्घटना म्हटली तर नैसर्गीक आपत्ती. पण या नैसर्गीक आपत्तीला बोलावले कुणी? या प्रश्‍नाचे उत्तर शोधणे पुनरावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने अपरिहार्य आहे.
गेल्या पावसाळ्यात महाडच्या सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर  मान्सूनपुर्व तपासणी अहवाल हा शब्द प्रशासनात परवलीचा तर बनला पण समाजाच्या जीभेवरही चांगलाच रूळला. तथापि अक्षर, शब्द या पलिकडे या शब्दाची महती कुणीच लक्षात घेतली नाही हेच काही ताज्या घटनांमधून निदर्शनास येत आहे. निंबोडी दुर्घटना ही त्यापैकीच एक. नदीवरील पुल, शासकीय निमशासकीय इमारती, रूग्णालयं, शाळा महाविद्यालयं, समाज मंदीरं, इतकेच नाही, तर खासगी वापरातील व्यवसायिक आणि निवासी इमारतींशी आणि या इमारतीत वावर करणार्‍या जीवांशी मान्सून पुर्व तपासणी अहवाल या शब्दाचा श्‍वासाइतका निकटचा संबंध आहे. या संबंधात थोडी जरी प्रतारणा झाली तरी अनेकांचे श्‍वास कायमचे बंद होतात याचा प्रत्यय आधी सावित्री आणि आता निंबोडी दुर्घटनेतून आला आहे.पावसाळा सुरू होण्यापुर्वी वापरात असलेली निर्देशित मालमत्ता वापरण्या इतपत कार्यक्षम आहे का? किरकोळ दुरूस्ती करून पुन्हा वापर करणे शक्य आहे का? जीर्ण असेल, कालबाह्य ठरत असेल कायमस्वरूपी वापर बंद करून पर्यायी व्यवस्था करणे हा सर्वे म्हणजे मान्सूनपुर्व तपासणी.
ही जबाबदारी विशेषत्वाने सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, महापालिका नगरपालिका, नगरपंचायत आणि शेवटी ग्रामपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित बांधकाम खात्यावर टाकण्यात आली आहे. प्रत्यक्ष पाहणीत संबंधित यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडीत नाही किंबहूना वरवर डागडुजी करून वेळ मारून नेण्यात या मंडळींचा अनुभव दांडगा आहे. कधी कधी तर कागदावर सारं अलबेल दाखवून संबंधित कामाचा निधी खर्ची दाखवून प्रत्यक्ष साइटवर न फिरकण्याचा विक्रमही यापैकी बर्‍याच विभागातील अनेक मंडळींच्या नावावर आहे. आज कुठल्याही गावात शहरात किंवा रस्त्यावर जाऊन पाहणी केल्यानंतर अनेक समाज मंदीर, शासकीय इमारती शाळा महाविद्यालयं खासगी व्यवसायिक निवासी इमारती आणि रूग्णालयांसह नदीवरील पुल मान्सूनपुर्व तपासणीची प्रतिक्षा करीत असल्याचे लक्षात येते. आपली व्यवस्था सोइची आहे. दुर्घटना झाल्यानंतर स्वर्ग पृथ्वीवर आणण्याचा द्रविडी प्राणायम करण्यात अग्रेसर आहे. तत्पूर्वी कर्तव्याशी प्रतारणा करतांना आपण भविष्यात अनेक जीवांना यमाच्या हवाली करण्याचे पाप करीत आहोत याचे भान राखले जात नाही. खरे तर सावित्री आणि निंबोडीच्या दुर्घटनेला जबाबदार धरून या प्रतारणाखोर प्रवृत्तींवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याचा पायंडा सुरू व्हायला. तेंव्हाच कुठे निष्पाप, अन् चिमुकल्या जीवांच्या आत्म्याला शांती लाभेल.