Breaking News

शेतकर्‍यांना मागणीनुसार वीज पुरवठा करणार - ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. 29, ऑगस्ट - अनियमित व अपुर्‍या पावसामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतातील पीके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांसाठी लोडशेडिंग कमी करुन  आवश्यकतेनुसार विजेचा पुरवठा करण्यात येईल अशी ग्वाही ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातल्या रेवराल येथे सुमारे 95 लाख 73 हजार रुपये खर्च करुन मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पुरक पाणी  पुरवठा योजना सुरु करण्यात येणार असून या योजनेचे भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण भागात शुध्द पिण्याचे पाणी पुरवविण्यासाठी मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या माध्यमातून योजना राबविण्यात  येतेय. ग्रामीण जनतेला आरओ असलेले पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महिला बचतगटाच्या माध्यमातून शुध्द जलयंत्र बसविण्यात येत आहे. केवळ पाच रुपयामध्ये  25 लिटर पाणी उपलब्ध होत असल्यामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत नाही. येत्या वर्षात ही योजना पूर्ण करुन येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यात येईल,  अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आवश्यकतेनुसार वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देतांना ते पुढे म्हणाले की, सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक  गावात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात येणार असून तलाव, शेततळे, बंधारे आदी ठिकाणी पाणी अडवूण या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येऊन  शेतीला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकर्‍यांनीही यासाठी पुढाकार घेवून जलसंधारणाच्या कामाला गती द्यावी, असेही त्यांनी यावेळी  सांगितले.
शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेबद्दल पालकमंत्री म्हणाले की, कर्जमाफी मिळणार्‍या तसेच नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 15 स्पटेंबर पूर्वी जवळच्या सेतू केंद्रात  ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकर्‍यांना मिळणार आहे. जिल्ह्याच्या  सर्वांगीण विकासासाठी पहिल्यांदाच 595 कोटी रुपयाची योजना तयार करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ 150 कोटी रुपये उपलब्ध होत होते. रेवराल येथे रेल्वे  उड्डाणपूल बांधण्यासंदर्भातही पुढाकार घेवून याला केंद्र व राज्य शासनाची परवानगी घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.