Breaking News

उत्सवांतून एकत्र येण्याची आवश्यकता- महापौर मुक्ता टिळक

पुणे, दि. 27, ऑगस्ट - गणेशोत्सव मंडळे सांस्कृतिक कार्यक्रम व देखाव्यांमधून सामाजिक संदेश देतात. त्याचा परिणाम समाजमनावर होतो. त्यामुळे शहराची  परंपरा व सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा आलेख मोठा होत आहे. सातत्याने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणे हे अनेक मंडळांचे वैशिष्टय आहे. मंडळात जे  पडेल ते काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे त्यांना सर्व गोष्टींची माहिती असते. म्हणूनच ते ख-या अर्थाने मॅनेजमेंट गुरु आहेत. उत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र  आला, तरच समाजातील मरगळ दूर होईल, असे सांगत महापौर मुक्ता टिळक यांनी कार्यकर्त्यांसह नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या लोकमान्य महागणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केसरी  वाडयातील लोकमान्य सभागृहात करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शैलेश टिळक, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, स्पर्धेचे परीक्षक पराग ठाकूर  आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरुप होते. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. लोकमान्य महागणेशोत्सव स्पर्धेत  सहकारनगरमधील अरण्येश्‍वर मित्रमंडळ गवळीवाडाने सर्वोकृष्ट मंडळाचे पारितोषिक पटकाविले. तर, गणेश पेठेतील काळभैवनाथ तरुण मंडळाने व्दितीय आणि  येरवडयातील अष्टविनायक मित्र मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच सोसायटी विभागात चिंचवडमधील आनंदवन सोसायटीने प्रथम क्रमांक पटकाविला.शैलेश  टिळक म्हणाले, वाडा संस्कृती संपून आता फ्लॅट संस्कृती आली आहे. परंतु पुण्यामध्ये उत्सवाची जपणूक आजही होत असून त्यांना प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा  प्रयत्न आहे. यंदा स्पर्धेमध्ये शहर व उपनगरांतील 78 मंडळे आणि 27 सोसायटयांनी सहभाग घेतला होता. पुढील वर्षी हा आकडा नक्कीच वाढेल, असा विश्‍वास  त्यांनी व्यक्त केला.