Breaking News

मुक्त विद्यापीठाची अभ्यासकेंद्रे सक्षम करणार - कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन

नाशिक, दि. 27, ऑगस्ट - सध्या दूरस्थ शिक्षण प्रणालीचा विकोत आहे. शिक्षण वितरण प्रणालीवरही ही पद्धत आपला प्रभाव टाकत आहे. सर्वांसाठी शिक्षण खुले  असणे तसेच वेळ, ठिकाण आणि अंतर यांच्या मर्यादा ओलांडून शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी निर्माण करणे ही दूरस्थ शिक्षण प्रणालीची खरी संकल्पना असून भविष्यात  ही शिक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली जातील. याशिवाय विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच  विद्यापीठाच्या राज्यातील सर्व अभ्यासकेंद्रे सक्षम करण्यावर आपण भर देणार असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी  सांगितले. 
मुक्त विद्यापीठाच्या राज्यातील विभागीय केंद्र संचालकांची विशेष बैठक काल विद्यापीठ मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  व्यासपीठावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या दिल्ली दोनचे संचालक डॉ. के. डी. प्रसाद, पुणे विभागीय केंद्राचे संचालक डॉ. मसूद परवेज, विद्यापीठाच्या  विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, दूरस्थ शिक्षण प्रणाली हे एक सांघिक काम असून ही जबाबदारी पूर्ण करताना, सर्वांना सोबत घेऊन विविध योजनांची  अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. या व्यतिरिक्त, गरजाभिमुख नवनवीन अभ्यासक्रम विकसित करणे, सध्या सुरु असलेले अभ्यासक्रम कायम  ठेऊन त्यांचे बळकटीकरण करणे, नियामक संस्थांच्या निकषानुसार अभ्यासक्रम सुरु करण्यावरही भर देण्यात येईल. याशिवाय विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण  करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र इ-व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी तयार करण्याचा मानस आहे. या इ-व्यासपीठद्वारे विद्यार्थी आपल्या  तक्रारी नोंदवू शकतील. विशेष म्हणजे या तक्रारींचे त्वरित निराकरण केले जाईल. यामुळे विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या दरम्यान, विश्‍वासाचे नाते निर्माण होण्यास  मदत होईल. सद्य:स्थितीत दूरस्थ शिक्षण प्रणालीसमोर अनेक आव्हाने असली तरी हे मुक्त विद्यापीठ या अडचणींवर यशस्वीपणे मात करेल, असा विश्‍वास कुलगुरूंनी  यावेळी व्यक्त केला.
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तळगाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहचविणे हा आपला मुख्य उद्देश असेल. या व्यतिरिक्त विभागीय केंद्रे आणि अभ्यास केंद्रे अधिक  सक्षम केले जातील. अभ्यासकेंद्र हे विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. बहुतांश विद्यार्थी मार्गदर्शनासाठी आणि शैक्षणिक साधनांसाठी  अभ्यासकेंद्रे आणि विभागीय केंद्रे यांना संपर्क करतात. यासाठी अभ्यासकेंद्रांचे सक्षमीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी अभ्यासकेंद्रांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने  सुसज्ज करण्याचे नियोजन आहे. याशिवाय अभ्यासकेंद्रांना विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुरेशा शैक्षणिक साधनांचा पुरवठा केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट  केले.