Breaking News

जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि. 25, ऑगस्ट - युवा शक्तीला योग्य गती व दिशा देण्यासोबतच त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता पुण्यामध्ये डॉ. सुधाकरराव जाधवर कला,  वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ते 29  ऑगस्ट दरम्यान न-हे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात ही स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व, भारुड, वादविवाद, पथनाटय या प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात येणार  आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रा.डॉ.सुधाकर जाधवर उपस्थित होते. स्पर्धेचे उदघाटन सोमवार, दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. उदघाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा  होणार असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण, सशक्त युवा सशक्त भारत, हरवत चाललेले बळीराजाचे राजपण, राष्ट्रनिर्मितीसाठी विज्ञानाचे योगदान, नाती  हरवत चाललेला समाज असे विषय आहेत. तर, भारुड स्पर्धा देखील याच दिवशी होणार आहे. कोणत्याही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला स्पर्धेत सहभागी होता येणार  आहे. शार्दुल जाधवर म्हणाले, वादविवाद व पथनाटय स्पर्धा मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 पासून सुरु होणार आहेत. वादविवाद स्पर्धेकरिता आजची  शिक्षण पद्धती आदर्श नागरिक घडविण्यास समर्थ आहे का ? हा विषय असणार आहे. तसेच पथनाटय स्पर्धेकरिता कोणत्याही सामाजिक विषयावर सादरीकरण  करण्याची मुभा स्पर्धकांना असणार आहे.सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला सात हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला पाच हजार रुपये, तृतीय क्रमांकाला तीन  हजार रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांकासाठी चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील  संघ सहभागी होणार असून नोंदणी सुरु आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेत सहभागाकरीता 9922074847,  9764337373, 9923317001 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.