Breaking News

दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना

पुणे, दि. 25, ऑगस्ट - पुणेकरांच्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आज सकाळी प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात आली. यावेळी अनेक भाविक  गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित होते.परंपरेप्रमाणे ‘श्रीं’ची गणपती मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास प.पू. पीरयोगी  श्री गणेशनाथ महाराज, गोरक्षनाथ मठ, त्र्यंबकेश्‍वर यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात आली. यावेळी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साही  होते. गणेश प्रतिष्ठापनेनंतर भाविकांची आशीर्वादासाठी गर्दी झाली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त श्री ब्रह्मणस्पती मंदिर  साकारण्यात आले आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7.00 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या  ब्राह्मणस्पती मंदिराचा आकार 111 बाय 90 फूट असून 90 फूट उंची आहे. याशिवाय गोलाकार घुमटाखाली साकारलेला तब्बल 36 फुटी नयनरम्य गाभारा हे  वैशिष्टय असणार आहे. डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत प्रधान आणि गाणपत्य प.पू.स्वानंद पुंड महाराज यांनी मुद्गल पुराणातून याविषयी शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.  त्याआधारे गणेशाची त्रिशूल, अंकुश, शंख, कमळ अशी अनेक आयुधे मंदिरावर लावण्यात आली आहेत. तर, हत्ती, मोर, गाय अशा विविध प्राण्यांच्या शिल्पांनी  मंदिरातील खांब सजविण्यात आले आहेत. सभामंडपाच्या छतावरील काचेच्या झुंबरांच्यावर रेखाटण्यात आलेली ब्राह्मणस्पती आणि गणेश यंत्र हे खास आकर्षण  असणार आहे. तब्बल एक लाख 25 हजार मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. तसेच अत्याधुनिक लाईटस् विद्युतरोषणाईकरिता लावण्यात  आले आहेत. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युत रोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.