Breaking News

उपळाईचे जवान जुबेरपाशा हबीब काझी यांना सेना पदक जाहीर

माढा, दि. 25, ऑगस्ट - सैन्यदलात कार्यरत उपळाई बुद्रुक येथील सैनिक जुबेरपाशा हबीब काझी यांनी सीमेवरील कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले  होते. या शौर्याबद्दल त्यांना सेना मेडल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सात सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक हे पदक प्रदान  करण्यात येणार आहे.
25 जून 2016 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास श्रीनगरमधील उडी सेक्टरमध्ये जंगलात अतिरेकी घुसल्याची खबर मिळाली होती. त्यावेळेस छावणीतून जुबेरपाशा  काझी यांच्यासह आठ सैनिक तेथे दाखल झाले. साधारण पंधरा मिनिटांनंतर हाती एके 47 असलेले दहशतवादी समोरून येताना दिसले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी  चकमक उडाली. त्यानंतर सुमारे एक तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू राहिला. यात जुबेरपाशा काझी यांनी दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या कामगिरीची  दखल घेत केंद्र सरकारने त्यांना सेना मेडल काही दिवसांपूर्वी जाहीर केले. जुबेरपाशा हे सुटीसाठी सध्या गावी उपळाई येथे आहेत. त्यांच्या सत्कारासाठी ग्रामस्थांसह  परिसरातील लोकांची त्यांच्या घरी मोठी रीघ लागली होती.
भारतमातेचे संरक्षण करणे हेच ध्येयकाझी ‘उरी सेक्टरच्या जंगलात समोरून दहशतवादी येत असल्याचे मला दिसले. त्यावेळी त्यांना ठार करून भारतमातेचे संरक्षण  करणे हेच ध्येय मनी घेतले होते. त्यांचा खात्मा केल्यावरच मला समाधान मिळाले. त्याचा मला अभिमान आहे,’ अशी प्रतिक्रिया काझी यांनी दिली.