Breaking News

धार्मिक उत्सवात कायद्याचे पालन करा-पोलीस प्रमुख शर्मा

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे. सामाजिक समस्यांवर भर देवून या उत्सवातून प्रबोधन  करावे. त्यासाठी प्रशासन पातळीवर सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. याकाळात प्रशासनाकडून हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, त्याच्या तक्रारी वरीष्ठांना  पाठवून कारवाई केली जाईल, असा इशारा देत गणेशोत्सव व बकरी ईदमध्ये सर्वांनी कायद्याचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा  यांनी केले.  
गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्‍वभूमिवर शहर पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोलावलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत शर्मा  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसिलदार साहेबराव सोनवणे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, निळवंडे धरणाच्या कार्यकारी अभियंत्या श्रीमती जगताप, उपविभागीय  पोलिस अधिकारी अशोक थोरात, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे, पो. नि. गोविंद ओमासे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग,  तालुक्याचे पो. नि. गोकुळ औताडे, पालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, उत्पादन शुल्कचे डी. डी. चौरे, विज वितरणचे अभियंता इंगळे, सहा. पो. नि.  रजपुत आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजित या बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांची अनुपस्थिती तसेच शहरातील वाढती गुन्हेगारी व समस्या चर्चेचा विषय ठरल्या.
शर्मा पुढे म्हणाले की, अवैध धंदे व वाढती गुन्हेगारीमुळे अहमदनगर जिल्हा राज्यभर गाजत आहे. त्यासाठी प्रथम दारू बंदीवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.  अवैधरित्या सुरू असलेल्या या व्यवसायावर पायबंद आणण्यासाठी मोहिम राबविली जात आहे. अनेक उपाय योजनांचा अवलंब देखील पोलिस प्रशासनाकडून केला  जात आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क व पोलिस असे मिळून काम करत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर जे जुगार अड्डे छुप्या पध्दतीने सुरू आहेत त्यावर  कारवाई होणार आहे. त्यांची व्हिडीओ क्लिप देखील सोशल मिडीयावर व्हायरल केली जाणार आहे, असे सांगून शर्मा म्हणाले की, गणेशोत्सव हा पवित्र उत्सव आहे.  तो पारंपारीक पध्दतीने साजरा करावा. दारू, जुगारामुळे या उत्सवाला गालबोट लागले जात आहे. याचा फायदा 1 टक्का असलेला समाजकंटक घेतो. गणेश मंडळांनी  अतिरेक न करता येणारे उत्सव सामाजिक बांधिलकीतून साजरे करावेत. इतर खर्चाला फाटा देत महिलांच्या प्रसाधन गृहाच्या समस्येमुळे होणारी हेळसांड थांबवून  त्यासाठी या कालावधीत प्रसाधन गृहाची निर्मिती करावी. त्याच बरोबर स्वाईन फ्ल्यु आजाराने अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे. त्याचे प्रबोधन गणेशोत्सवाच्या  माध्यमातून प्रबाधनाव्दारे करून प्रत्येक मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जणेकरून गुन्हेगारीवर लक्ष ठेवता येईल. त्यासाठी लागणारी मदत पोलिस  प्रशासनामार्फत केली जाईल, असे आश्‍वासन देत जिल्हाभर पोलिसांमार्फत क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असून त्याची सुरूवात श्रीरामपूर येथून करण्यात  आली आहे. डिजेला फाटा देवून पारंपारीक वाद्यांना प्रोत्साहन द्या, त्यामुळे या व्यवसायाला रोजगार देखील मिळेल. या उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित  राहण्यासाठी नागरीकांचे सहकार्य मोलाचे आहे. प्रशासनाकडून होणार्‍या चुका कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे आढळल्यास त्यांची तक्रार वरिष्ठापर्यंत केली  जाईल, तसेच नागरीकांनीही कायद्याचे पालन करावे असा इशारा देखील पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी दिला.
याप्रसंगी मागील सभेचा इतिवृत्तांत पोलिसांनी वाचला, यावर शिवसेनेचे कैलास वाकचौरे यांनी हस्तक्षेप घेत शहरातील गुन्हेगारीचा आलेखही पोलिसांनी मांडावा,  त्यामुळे गुन्हेगारीची माहिती जनतेला होईल. शहरात व तालुक्यात अनेक घटना घडतात, त्याचा तपास अथवा माहिती नागरीकांना मिळत नाही. याची माहिती  उपलब्ध झाल्यास पोलिस प्रशासन व जनतेत समन्वय राहिल. यावेळी शहरातील विज, रस्ते, घन-कचरा, वाहतुक कोंडी, अवैध धंदे या विषयावरील चर्चा चांगलीच  गाजली. याप्रसंगी विश्‍वास मुर्तडक, अ‍ॅड. रंजना गवांदे, राधावल्लभ कासट, कैलास वाकचौरे, अविनाश थोरात, नवनाथ अरगडे, किशोर टोकसे, किशोर पवार, शौकत  जहागिरदार, अमर कतारी, तळेगावच्या सरपंच प्रमिला जगताप, सिताराम मोहरीकर, आरीफ देशमुख, शैलेश कलंत्री, त्रिलोक कतारी, आंबादास आडेप, शिरीष मुळे,  राजेश सांगळे, शरीफ शेख, अ‍ॅड. सुहास आहेर, घनश्याम जेधे, नरेश माळवे, बबलु वामन आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.