Breaking News

तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी

नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. कोर्टाने तिहेरी तलाकचा  चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत, सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली आहे.  सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लिम महिला आनंद व्यक्त करत आहेत, तर सरकारनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे योग्य पाऊल असल्याचं म्हटलं आहे. अनेक वर्षांपासून महिला  पाडित आहेत. आपल्या धर्मातील अर्धी संख्या पीडित असावी, असं कोणत्याही धर्माला वाटणार नाही, असं त्यांनी नमूद केलं. सरकार तिहेरी  तलाकविरोधात लवकरच कायदा करेल. तातडीने कायदा बनवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, संविधानात सर्वांसाठी समान अधिकार आहे असं मेनका  गांधी यांनी म्हटलं. तिहेरी तलाकविरोधातील हे लहान पण उत्तम पाऊल आहे. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. परंपरांचा आदर आहे, मात्र आयुष्य उद्ध्वस्त  करणार्‍या परंपरा या काळानुरुप बदलायला हव्यात, असंही त्यांनी सांगितलं.