Breaking News

राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले

सांगली, दि. 27, ऑगस्ट - कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण र्पूेने भरल्याने शनिवारी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी या धरणाचा दरवाजा क्रमांक सहा  उघडण्यात आला असून प्रतिसेकंद पाच हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. 
राधानगरी धरणातील दोन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून या मान्सून कालावधीत तिस-यांदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे  भोगावती व पंचगंगा नद्यांची पाणीपातळी वाढली असून पूरपातळी गाठण्याचा धोका निर्माण झाला असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला  आहे. पंचगंगा नदी ही कृष्णा नदीला श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मिळते, त्याठिकाणच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने तेथेही दक्षतेची सूचना करण्यात  आली आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाने उघडीप दिली असल्याने चांदोली येथील वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. सध्या  धरणात 96.32 टक्के पाणीसाठा झाला असून येत्या आठ ते दहा दिवसात हेही धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा संबंधित विभागाकडील अधिका-यांनी व्यक्त केली  आहे. चांदोली धरण परिसरात गत 24 तासात 12 मिलीमीटर, तर एकूण 1750 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या या धरणाची पाणीपातळी 625.850  मीटर, तर या धरणात 34.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.