Breaking News

ताजमहालच्या जागी शंकराचे मंदिर नव्हते; पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - ताजमहालच्या जागी यापूर्वी कोणतेही शंकराचे मंदिर नव्हते. तसेच त्याचे नाव तेजो महाल होते याबाबत कोणतेही पुरावे मिळालेले  नाहीत, असा अहवाल आज केंद्रीय पुरातत्त्व विभागाने लेखी स्वरूपात न्यायालयात सादर केला.
आग्रा न्यायालयात 2015 मध्ये सहा वकिलांनी एक याचिका दाखल केली होती. ताजमहाल हे पूर्वी शंकराचे मंदिर असून ते तेजो महाल नावाने ओळखले जात होते.  त्यामुळे याच परिसरात आरती करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. तसेच ताजमहालात काही खोल्या बंद आहेत त्या  उघडण्यात याव्या अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेबाबत आज सुनावणी झाली. त्यावेळी भारतीय पुरातत्त्व खात्याचे म्हणणे काय आहे हे  न्यायालयाने जाणून घेतले. सतराव्या शतकात बादशहा शाहजान याने त्याची पत्नी मुमताजच्या स्मृती जपण्यासाठी या वास्तूची निर्मिती केली आहे, असे पुरातत्त्व  खात्याकडून सांगण्यात आले आहे. आता या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.