Breaking News

दिग्दर्शकांनाच सेन्सॉरशिपचे निर्बंध घालून घेण्याची सोय हवी : चंद्रकांत कुलकर्णी


औरंगाबाद, दि.30 : दिग्दर्शकांकडेच निर्बंध घालून घ्यायची सेन्सॉरशिप असणे आवश्यक आहे. मराठी सिनेमा व दिग्दर्शक नेहमीच सेन्सॉरशिपमध्ये अडकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयात आयोजित ’सिनेमा, समाज आणि सेन्सॉरशिप’ या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रात कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. वि. ल. धारूरकर होते. एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, प्रा. जयदेव डोळे, पत्रकार प्रशांत दीक्षित, डॉ. दिलीप घारे, प्राचार्य डॉ. रेखा शेळके, डॉ. विशाखा गारखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलकर्णी म्हणाले, की सेन्सॉर बोर्डावर चित्रपट बघताना तेथील माणसांचे वैयक्तिक समज असतात. सेन्सॉरशीपची गाईडलाईन जरूर असावी. परंतु, सत्तांतर झाल्यानंतर माणसे बदलतात. यासंबंधीची काही उदाहरणेही त्यांना प्रेक्षकांना दिली. ’आजचा दिवस माझा’, ‘मुरांबा’ यासारख्या सिनेमांवरही फुटकळ जागी आक्षेप घेण्यात आले होते. नको ते सिनेमे सुटतात आणि चांगले चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडतात, असेही कुलकर्णी म्हणाले. या वेळी प्रा. डॉ. धारूरकर, डॉ. दिलीप घारे, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ. बापू चंदनशिवे, डॉ. सुहास पाठक, डॉ. तुकाराम दौड, डॉ. बालाजी शिंदे, प्रा. राजेंद्र गोनारकर आदींनी मनोगत व्यक्त केले. नीलेश राऊत, सुबोध जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. आशा देशपांडे यांनी तर डॉ. विशाखा गारखेडकर यांनी आभार मानले.