Breaking News

पुणे शहर व जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

पुणे, दि. 21, ऑगस्ट - मागील तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.  पावसाच्या या कमबॅक एन्ट्रीने विदर्भ आणि मराठवाड्यात धुव्वाधार खेळी केली असून, नांदेड, मुदखेड आणि नायगाव येथे अतिवृष्टी झाली आहे. याठिकाणी  गेल्या 24 तासात पावसाने डबल सेन्च्युरी मारली आहे. यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्यातही जोरदार पाऊस झाला. दरम्यान, पुणे शहर आणि  जिल्ह्यात गेल्या 24 तासात रविवारी (दि. 20) रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात 70 मीमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हा,  बारामती, शिरूर, इंदापूर, भोर, जुन्नर या भागातही दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहर आणि जिल्ह्यात  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. 
अवघ्या पाच दिवसांवर गणपती बाप्पाचे आगामन आले आहे. त्यातच रविवार सुट्टीचा दिवस आल्यावर तुळशीबाग, रविवार पेठ, भोहरी आळी येथे जावून  खरेदी करण्याची तयारी नागरिकांनी केलीच होती. परंतू, शनिवारी (दि. 19) मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने रविवारी दिवसभर थांबायचे  नावच घेतले नाही. उलट सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाची संततधार, ठिकठिकाणी साचलेले पाणी  आणि झाडपडीच्या घटनांमुळे नागरिकांनी सुट्टीच्या दिवशीही घरात बसणेच पसंत केले. शहरासह उपनगर भागात कोथरूड, वारजे, कात्रज, औंध, येरवडा,  खडकी, हडपसर, विश्रांतवाडी, धनकवडी या भागातही झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.
मागील दोन महिन्यांच्या प्रदिर्घ विश्रांतीनतर जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर, पुरंदर तालुक्यात पावसाचे आगमन झाले असून खेड, जुन्नर,  आंबेगाव, मुळशी, मावळ, भोर, वेल्हे, हवेली तालुक्यातही पावासाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भोरगिरी,  भीमाशंकर परिसरात अतिवृष्टी झाली असून गेल्या 24 तासांत तब्बल 120 मीमीपेक्षाही अधिक पावासाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे ओढे, नाले  खळखळून वाहू लागले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, बारामतीमती तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असून शेतकर्‍यांनी दुबार पेरणी न  करता रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे  खाचारामध्ये पुन्हा पाणी साचल्याने भाताचे दमदार उत्पादन येण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. जर हा पाऊस आणखीन काही दिवस असाच  बसरत राहिला तर दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर, पुरंदर तालुक्यांतील पाण्याचा प्रश्‍न मिटेल असेही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.