Breaking News

दिल्ली, गुडगाव आणि परिसरात गणेशोत्सवाची धामधूम

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - दिल्ली , गुडगाव व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अनेक ठिकाणी गणेशोत्सवाला मोठ्या धामधुमीत प्रारंभ झाला. वेगवेगळ्या ठिकाणी गणेश  मंडळांनी देखाव्यामधून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गुडगावमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्वचछ भारत, ग्रीन इंडिया सारखे पर्यावरणाचे  संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाले असून या मंडळाची गणपतीची मुर्ती शाडूपासून तयार करण्यात आली आहे. तसेच त्यांनी  सजावटीसाठी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर केला असून प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळलेला आहे.
10 दिवसांमध्ये होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी या दरम्यान कवी संम्मेलन, हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि मराठी नाटक यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन  केले आहे. हा कार्यक्रम 25 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी 7.30 नंतर हुडा समुदाय केंद्र सेक्टर 27 येथे होणार आहे.
दिल्लीतील लाल बागच्या राजाच्या मुर्ती दिल्लीतील सर्वात उंच मुर्ती असल्याचा दावा गणेश मंडळाने केला आहे. ही गणेश मुर्ती मुंबईतील लाल बागच्या राजाची  प्रतिकृती असल्याची माहिती लाल बागचा राजा ट्रस्टचे अध्यक्ष राकेश बिंदल यांनी सांगितले. श्री गणेश सेवा मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत  मोहिमेला चालना देण्यासाठी यमुना बचाओ, पर्यावरण बचाओ असा संदेश दिला आहे. अनंतचतुर्थीच्या दिवशी देखील नदीचे पाणी खराब होऊ नये यासाठी चार  कृत्रिम तलाव तयार केले आहेत.