Breaking News

औट्रम घाट बोगद्याचे नियोजित अंतर कमी केल्याने एक हजार कोटीची बचत

औरंगाबाद, दि. 24, ऑगस्ट - सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 च्या तिस-या टप्प्यातील महत्वाचा असलेल्या औट्रम घाट (कन्नड) येथे तब्बल  साडेअकरा किलोमीटरचा बोगदा आराखड्याचे फेरसर्वेक्षण करून नवीन आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात बोगद्याचे अंतर चार किलोमीटरने कमी होणार  आहे. त्यामुळे तब्बल एक हजार कोटींची बचत होणार असून, अंतर पार करण्याचा वेळही वाचणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर - धुळे रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सोलापूर - येडशीच्या पहिल्या टप्प्याचे  बहुतांश काम पूर्ण झाले आहे. येडशी ते औरंगाबाद या दुसर्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर आहे. दोन्ही टप्पे मे 2018पर्यंत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाचा (एनएचएआय) मानस आहे. दरम्यान, औरंगाबाद ते धुळे या तिस-या टप्प्यांसाठी स्वतंत्र कंत्राटदार न मिळाल्याने त्याचे तीन उपटप्पे पाडण्यात आले.  त्यात कन्नड येथील औट्रम घाटाच्या बोगद्याचा समावेश आहे. सुरवातीला सादर केलेल्या प्रस्तावात औट्रम घाटात साडेअकरा किलोमीटरचा बोगदा प्रस्तावित आहे.
त्यासाठी साडेचार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी स्वित्झर्लंड येथील अँबार्क इंजिनीअरिंग कंपनीला डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल)  तयार करण्याचे काम मिळाले आहे. बोगद्याच्या रस्त्यासाठी सहा पर्याय सुचविले होते. त्यापैकी दुसरा पर्याय निवडला गेला होता. या बोगद्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात  आले. त्यात आधी सूचविलेल्या साडेअकरा किलोमीटरऐवजी 7.1 किलोमीटरचा नवीन मार्ग बोगद्यासाठी प्रस्तावित केला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; केंद्रीय  स्तरावर या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली आहे. नवीन प्रस्तावामुळे पूर्वीच्या साडेचार हजार कोटींऐवजी साडेतीन हजार कोटीमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे एक हजार कोटी रुपये वाचणार आहेत. शिवाय वेळेचीही बचत होणार आहे.