Breaking News

स्मार्टसिटीच्या निधीतून संत एकनाथ रंगमंदिराची दुरुस्ती होणार

औरंगाबाद, दि. 09 - स्मार्टसिटी प्रकल्पासाठी मिळालेल्या निधीतून संत एकनाथ रंगमंदिराची दुरुस्ती करू, अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर  यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेच्या फंडातून साफसफाई व रंगरंगोटीचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिर  महापालिकेच्या मालकीचे आहे. या रंगमंदिराची अवस्था फारच बिकट झाली आहे. अभिनेता सुमित राघवन यांनी रंगमंदिराच्या दुरवस्थेचे सोशल साइटवरून वाभाडे  काढले. ‘शिवसेना, जरा इकडे लक्ष द्या,’ असे म्हणत राघवन यांनी संत एकनाथ रंगमंदिराची दुरावस्था फेसबुकच्यामाध्यमातून सर्वांच्या समोर मांडली. यापूर्वी प्रशांत  दामले यांनी तर पुढाकार घेऊन रंगमंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले होते. फाटलेल्या खुर्च्या शिवल्या होत्या. त्यांच्या या अनोख्या आंदोलनात  शहरातील रंगकर्मी देखील सहभागी झाले होते. ‘संत एकनाथ रंगमंदिराची अवस्था चांगली नाही, ही वस्तुस्थिती आहे.रंगमंदिर दुरुस्त करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न  सुरू आहेत. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी मिळालेल्या निधीतून रंगमंदिराच्या दुरुस्तीचे काम करण्याचे ठरविले आहे. स्मार्टसिटीच्या ‘एसपीव्ही’ची बैठक 11 ऑगस्ट रोजी  होणार आहे. संत एकनाथ रंगमंदिराच्या डागडुजीसाठी स्मार्टसिटीच्या रक्कमेतून निधी मिळावा, असा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. तो मंजूर झाल्यावर  लगेचच काम केले जाणार आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या फंडातून साफसफाई व रंगरंगोटीचे काम केले जाईल.’असे ते म्हणाले.