Breaking News

चॉकलेट मोदक केकची गिनीज बुकमध्ये नोंद

पुणे, दि. 25, ऑगस्ट - पुण्यातील पाच प्रसिद्ध मानाच्या गणपतींपैकी एक असलेला दगडू शेठ हलवाई गणपती यंदा 125 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त  दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 1970 किलो वजनाचा चॉकलेट मोदक केक बनविण्यात आला आहे. या मोदक केकची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये  करण्यात आली आहे.
तयार करण्यात आलेल्या या चॉकलेट मोदक केकचे वजन 1970 किलो एवढे आहे. हा केक 17 शेफच्या मेहनतीने गुरुवार 24 ऑगस्ट रोजी पुण्याच्या अण्णाभाऊ  साठे सभागृहात तयार करण्यात आला आहे. या केकसाठी लागणारा खर्च श्रीमंत दगडू शेठ हलवाई ट्रस्ट आणि द केक हाऊस पुणे यांनी केला आहे.
पुण्याच्या द केक शॉपचे मालक धर्मनाथ एकनाथ गायकवाड यांच्या केकची यापूर्वी लिम्का बुक ऑफ वर्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. तयार करण्यात आलेल्या या  1970 किलोच्या केकसाठी धर्मनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 17 शेफनी काम केले. मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बटरपासून थ्री डी शिल्प साकारणारे  शेफ भूषण विजय चिखलकर हेही यात सहभागी होते.
हा भव्य केक बनविण्यासाठी शेफना तीन दिवस तयारी करावी लागली. 17 शेफच्या मेहनतीने 10 तासांच्या आत हा केक तयार करण्यात आला आहे. 48 बाय 24  आकाराच्या या केकचे परिक्षण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या काही एक्झिक्युटिव्ह शेफनी केले. अनेक मान्यवर शेफ आणि कॅमेर्‍याच्या निगराणीत हा केक तयार  करण्यात आला. हा केक दगडूशेठ हलवाई ट्रस्टमधून वाटण्यात येणार असल्यामुळे तो मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना द केक हाऊसचे मालक म्हणाले, यात माझे 17 शेफ सहभागी होते. याचा जागतिक रेकॉर्ड झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. त्याचबरोबर दगडू शेठ  हलवाई ट्रस्टने आम्हाला खूप चांगल्याप्रकारे मदत केली. त्यामुळे हा अनुभव आम्हाला घेता आला आहे.
एक शेफ म्हणून आशा मोठ्या टीम बरोबर काम करायला मिळाले, छान अनुभव होता. मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे थ्री डी शिल्प साकारल्यानंतर मला ही एक  छान संधी मिळाली आणि मला यातून खूप काही शिकता आले, अशी भावना शेफ भूषण विजय चिलखलकर यांनी यावेळी व्यक्त केली.