प्रशुल्क प्रस्ताव संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध
सातारा,दि.6 : देखभाल-दुरुस्ती, परिरक्षण व त्यासाठीच्या आस्थापनेचा वाढता खर्च विचारात घेऊन सन 2011 च्या पाणीपट्टीदरात वाढ करणे विचाराधीन आहे. पाणीपट्टी दरात वाढ केल्याशिवाय सिंचन प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीस आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. परिणामी पाणी वापराची कार्यक्षमता राखणे, समन्यायी पाणी वाटप, कालव्याच्या पुच्छ भागातील शेतकर्यांना पाणी देणे ही उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने अधिनियमातील कलम 11 (घ) नूसार जून 2014 मध्ये निर्धारित केलेल्या निकषानुसार पाणीपट्टी दर सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला
आहे. या प्रस्तावाची छाननी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने केलेली असून प्राधिकरणाच्या अभिप्रायानुसार पाणीपट्टीचा दराचा प्रस्ताव सुधारित करण्यात आलेला आहे. दि. 29 जून 2011 च्या शासन निर्णयातील दराच्या तुलनेत सर्वसाधारणपणे कृषी क्षेत्रासाठी 20 टक्के वाढ प्रस्तावित आहे. ग्रामपंचायत व नगरपालिकांच्या घरगुती वापराच्या पाणीपट्टी दरात कोणतीही वाढ प्रास्तावित केलेली नाही. मात्र महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी 14.3 टक्के वाढ प्रस्तावित आहे. औद्योगिक वापरासाठी 38 टक्के वाढ प्रस्तावित आहे. मात्र बॉटलींग इंडस्ट्रीसाठीच्या पाणीपुरवठ्याच्या दरात 588 टक्क्यांनी वाढ प्रस्तावित आहे.