Breaking News

सातारा नगरपरिषदेतर्फे मिळकत करात 26 टक्क्यांची कपात

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) : सातारा नगरपालिकेने सन 2017-2018 पासून लागू केलेली करवाढ अपील समितीच्या निर्णयानंतर मागे घेतली. त्यामुळे निवासी करात 26 टक्क्यांची कपात करून ही करवाढ 4 टक्के करण्यात आली. बिगर निवासी करात (व्यावसायिक कर) 10 टक्क्यांची कपात करून 20 टक्के कर आकारणी करण्यात येणार आहे. तर, नव्या मिळकत करात 50 टक्क्यांची सवलत देण्यात आली.
सातारा नगरपरिषदेच्या अपील समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांवर दि. 20 रोजी सातारा प्रांताधिकारी तथा पदसिध्द अपील समिती सभापती डॉ. स्वाती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, विरोधी पक्ष नेते अशोक मोने व महिला बाल कल्याण समिती सभापती सविता फाळके यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली.
यावेळी प्रांताधिकार्‍यांनी प्राधिकृत मुल्यनिर्धारण अधिकारी तथा सहा. संचालकांनी केलेली करवाढ योग्य असून ती कायम करावी, असे मत मांडले. पूर्वीच्या वार्षिक भाडे अंदाजावर केलेली 30 टक्के वाढ जास्त असल्याने ती निवासीसाठी 4 टक्के व बिगर निवासीसाठी 10 टक्के वाढ करावी. तसेच नवीन मिळकतीसाठी वार्षिक भाडे अंदाज 50 टक्के कमी करावे, असे मत सौ. माधवी कदम, अशोक मोने, सविता फाळके यांनी मांडले.
सातारा शहरातील नागरिकांवर कर आकारणीचा जास्त भार पडू नये म्हणून नगर परिषदेच्या तीन सदस्यांनी बहुमताने प्राधिकृत निर्धारण अधिकारी यांनी केलेल्या वाढीतून निवासीसाठी 26 टक्के वाढ कमी केली. व्यावसायिकसाठी 20 टक्के वाढ कमी करण्यात आली. नवीन मिळकतीची 50 टक्के आकारणी कमी करुन सातारा शहरातील नागरिकांवरील कराचा बोजा कमी करुन दिलासा दिला. दरम्यान, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी अंदाजपत्रकीय विशेष सभेत या करवाढीला तीव्र विरोध केला होता. समितीसमोर झालेल्या सुनावणीतही त्यांनी निवासी करात 3 टक्के करवाढ करण्याची मागणी केली. बिगर निवासी तसेच नवीन मिळकत कर अजून कमी करावा, यासाठी मोने प्रयत्नशील राहिले. विरोधक तसेच सत्ताधारी दोन्ही गटाच्या पदाधिकार्‍यांनी करवाढ कमी करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.