मोटारसायकल रॅलीने आजपर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व रॅलींचे विक्रम मोडले
सातारा,दि.6 :मुंबईत क्रांतीदिनी 9 ऑगस्टला होत असलेल्या मराठा क्रांती महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजधानी साता-यात शनिवारी मराठ्यांचे भगवे तुफान उठले. जिकडे तिकडे भगवे ध्वज व भगव्या पताका यामुळे शहरात चैतन्याची लाट उसळली. जनजागृतीसाठी काढलेल्या या विराट मोटारसायकल रॅलीने
आजपर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व रॅलींचे विक्रम मोडले. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल ते राजवाडा व पुन्हा राजवाडा ते खालच्या रस्त्याने क्रीडा संकुल हे प्रमुख रस्ते मराठामय होवून वाहिले. यावेळी घुमलेल्या ‘एक मराठा लाख मराठा’च्या ललकारीने शाहूनगरीतील अवघा माहोल मराठा क्रांती मोर्चामय होवून गेला. ‘मराठा माणूस भडकला भगवा झेंडा फडकला’ या घोषणांनी राजधानी सातारा पेटून उठली.
मुंबईत होणा-या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये जनजागृती आणि वातावरण निर्मिती करण्यासाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीसाठी शनिवारी सकाळपासूनच शाहूनगरी वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली. बघावे तिकडे भगवे ध्वज व भगव्या पताका फडकू लागल्या. दुचाकी वाहनांवर ध्वज लहरत होते. शहरातील अवघे रस्ते दुपारपासूनच जिल्हा क्रीडा संकुलाच्या दिशेने वाहू लागले होते.शहरासह जिल्हाभरातून सकल मराठा समाजातील बांधव व भगिनी साता-यात दाखल झाले होते. बघता बघता जिल्हा क्रीडा संकुल पुन्हा एकदा मराठ्यांच्या तुफान गर्दीने बहरुन गेले. प्रारंभी मराठा क्रांती मोर्चाची माहिती व महती सांगणारे पथनाट्य मराठा युवतींनी सादर केले. यातून सामाजिक प्रबोधनही करण्यात आले. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष रॅलीला सुरूवात झाली. रॅलीच्या अग्रभागी एका जीपमध्ये पारंपारिक वेशामध्ये भगवा फेटा परिधान केलेल्या युवती व महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनात छ. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ठेवण्यात आला होता. त्यानंतर रॅलीत सहभागी झालेल्या दुचाकी वाहनांचे तुफान उठले. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘तुमच आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय’, ‘बघताय काय रागानं रॅली काढलीय
वाघानं’, ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहतं नाय’, रक्ता रक्तात भिनलय काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘एकदाच घुसणार, भगवा दिसणार’, ‘हर हर महादेव’,‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’,‘9 तारीख चलो मुंबई’ अशा विविध घोषणांनी रॅलीचा मार्ग दणाणून गेला होता. रॅलीत अनेक युवक व युवती भगवे फेटे, टी शर्ट, भगव्या टोप्या, गळ्यात भगवे उपरणे परिधान करून सहभागी झाले होते. यावेळी रॅली मार्गावरील सर्व रस्ते ब्लॉक झाले होते. रॅलीसाठी पोलिसांनी मुख्य चौकाला छेदणारे रस्ते बॅरिकेटस् लावून अडवले होते. रॅली सुरू होण्यापूर्वीच रॅली मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आला होता. तसेच ठिकठिकाणी रॅली मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रॅलीची सांगता शाहू स्टेडियमवर झाली.
