Breaking News

रेल्वेमार्गाचे काम होण्याआधीच दोन पूल खचले

बीड, दि. 27, ऑगस्ट - नगर - बीड - परळी रेल्वेमार्गाची अनेक वर्षाची मागणी प्रचंड आंदोलने, पाठपुरावा यानंतर मार्गी लागली व काही काम सुरू झाले वाटत  असतानाच या मार्गावरचे दोन पूल गेल्या दोन तीन दिवसात झालेल्या पावसाने उखडले आहेत. या पुलांच्या संरक्षक भिंती शुक्रवारी ढासळल्याने या पुलालगतचा भाग  खचला आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा व सुंबेवाडी येथील पुलांच्या संरक्षक भिंती पावसामुळे शुक्रवारी रात्री ते शनिवार सकाळ या दरम्यान ढासळल्याचे आढळून  आले. प्रचंड प्रयत्नानंतर सुरू झालेल्या या कामाच्या दर्जावर या घटनेने प्रश्‍नचिन्ह लागले आहे. अजून हा मार्ग कार्यान्वित होण्याआधीच ही गत असेल तर बीड  जिल्ह्यात या रेल्वेचे दर्शन कधी होणार हा प्रश्‍न उभा राहिला आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वी या प्रस्तावित रेल्वेमार्गावर नगर जिल्ह्यात रेल्वेची चाचणीही झाली.  त्यावेळी बीड जिल्ह्यात आता हे काम लवकर पूर्ण होण्याबाबत आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र आता या दुर्घटनांमुळे बीड जिल्ह्यात निराशा आणि संतापाचे  वातावरण आहे. सुंबेवाडी आणि पिंपळानजिक हे पुलाचे काम ढासळल्याचे कळाल्यानंतर रेल्वेच्या केंद्रीय अधिका-यांनी या घटनास्थळाची पाहणी केली. या आधारे  आता या कामाशी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर काय कार्यवाही होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.