Breaking News

मावळ गोळीबार प्रकरणातील शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेणार


पुणे,दि.6 :  मावळ तालुक्यातील शेतकर्‍यांना
 दिलेल्या आश्‍वासनांपैकी दोन आश्‍वासनांची पुर्तता होणार आहे. मावळ गोळीबार प्रकरणातील शेतकर्‍यांवरील गुन्हे सरकार मागे घेणार आहे, असे आश्‍वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार बाळा  भेगडे यांनी दिली. मात्र बंद जलवाहिनी प्रकल्प बंदीचा शासनाला विसर पडला की काय, असा संतप्त सवाल मावळवासियांनी उपस्थित केला आहे.भाजप सत्तेत येण्यापूर्वी प्रचार सभेत मावळ गोळीबारात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना सत्तेत आल्यावर नोकरी लावू, शेतकर्‍यांचे स्मारक उभारू, शेतकर्‍यांवरील 307
सारखे गुन्हे मागे घेऊ व बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करू, अशी आश्‍वासने दिली होती. त्यापैकीचे मावळ गोळीबार प्रकरणातील आंदोलनातील शेतकर्‍यांवरील गुन्हे सरकार मागे घेणार आहे. येत्या 8 ऑगस्ट रोजी हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, असे आश्‍वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे, अशी माहिती मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी दिली. आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची भेट घेऊन शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. मुनगंटीवर यांनी त्वरित गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर शेलार, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्‍वर दळवी, भाजपचे मावळ प्रभारी भास्करराव म्हाळसकर, आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना मावळ विभाग प्रमुख राजू खांडभोर, शिवसेना ज्येष्ठ नेते भारत ठाकूर, भाजयुमेचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कार्याध्यक्ष अजित आगळे, राजेश मुर्‍हे, संदीप भुतडा, मधुकर धामणकर, रामा गोपाळे, संभाजी म्हाळसकर तसेच आंदोलक व शेतकरी उपस्थित होते. येत्या 9 ऑगस्ट 2011 रोजी पवना धरणातून भूमिगत जलवाहिनीच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन केले होते. आंदोलनाला हिंसक वळण
मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मावळातील सुमारे 190 शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केले होते. शेतकर्‍यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे यासाठी आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री मुनगंटीवर यांच्या सोबत आमदार भेगडे आणि शेतकर्‍यांची मुंबईत बैठक झाली. या वेळी मुनगंटीवर म्हणाले की, आमदार भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन हे अत्यंत योग्य होते. आंदोलक शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. नुकसानी बाबत चुकीची माहिती देऊन आंदोलक शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चुकीच्या मार्गाने नोंदविलेले गुन्हे निश्‍चितपणे मागे घेण्यात येतील. आठ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन गुन्हे मागे  घेण्यात येतील, असे आश्‍वासन मुनगंटीवार यांनी दिले आहे, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली. या पूर्वी आंदोलनात मृत पावलेल्याच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड  महापालिकेत शासकीय नोकरी दिली आहे. शहीद शेतकर्‍यांचे स्मारकाचे कामही सुरू आहे, यामुळे या शासनाने सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत
असल्याने मावळच्या शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. बंद पाईप लाईन कायमची रद्दची घोषणा करावी व हे पाणी रावेत येथे कोल्हापूर पद्धतीचा (केटी) बंधारा बांधून उचलावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.