Breaking News

साता-यात पाठकजी कुटुंबियांनी साकारला संगीतगणेश

सातारा, दि. 28, ऑगस्ट - गेल्या वर्षी पदमाकर पाठकजी व त्यांचे चिरंजीव जयदीप यांनी घरातील पुस्तकांच्या साह्याने ज्ञानगणेश साकारल्यानंतर यंदाच्या वर्षी  संगीतगणेश साकारण्याची कल्पना मनात आणली. या पिता-पुत्रांनी गणेशाच्या सजावटीसाठी 21 वाद्ये जमविण्याचा संकल्प केला. साता-यातील मित्र, नातेवाईक  आणि घरात असलेली अशी मिळून 21 पेक्षा जास्त वाद्ये जमली. तंबोरा, सतार, संवादिनी, तबला यांसह दिलरुबा, सनई-चौघडा, जलतरंग, मृदुंग, ट्रम्पेट यांसारखी  विविध वाद्ये एकत्र केली. विविध गायक-गायिका, संगीतकार यांची छायाचित्रे जमा केली. घरात असलेली संगीतविषयक पुस्तकेही सजावटीसाठी वापरली. संगीत  ऐकण्याच्या माध्यमाचा प्रवासही मांडायचा ठरवला. ग्रामोफोन, नॅशनल एकोच्या रेडिओपासून ते पेन ड्राइव्हपर्यंत विविध वस्तू संग्रहात होत्याच. त्याही एकत्र केल्या.
या अनोख्या सजावटीबद्दल माहिती देताना पदमाकर म्हणाले की, ज्या शहरात आमच्यावर संगीताचे संस्कार झाले आणि जेथे आमच्यातील कानसेन घडला त्या  साता-यातील संगीतसाधकांच्या नावांचे संकलनही या निमित्ताने झाले. अगदी दरबारी गायकांपासून ते आजच्या पिढीतील गायक-वादक, संगीताचे शिक्षण देणा्या  संस्था यांच्या नावांचे संकलन करण्यात आले. सजावटीमध्ये वैविध्य आणण्यासाठी वाद्यांच्या छायाचित्रांच्या साह्याने सजवलेली दीपमाळ, संगीतातील विविध रागांची  कमान, विविध राग आणि तालांपासून तयार केलेला स्वर-ताल वृक्ष अशा विविध गोष्टी घरीच तयार केल्या. साता-यातील विविध कलाकारांनी विविध वाद्यांचे वादन  करणा-या गणेशाची चित्रे साकारली. या संपूर्ण सजावटीला पूरक गोष्ट म्हणून वीणा वादन करणारा गणपती प्रसाद चव्हाण या खास मूर्तिकाराकडून करून घेतला. गेले  काही महिने सुरू असलेल्या अथक मेहनतीतून हा संगीतगणेश साकारला आहे. एकंदरीतच हा संगीतगणेश म्हणजे एक देशातील संगीत क्षेत्राचा सुरेल प्रवासच येथे  आपणाला पहायला मिळत आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून सार्वजनिक गणेश मंडळाच्या सजावट देखावे पाहण्याप्रमाणेच हाही संगीत देखावा सातारकरांनी निश्‍चितच  पाहण्याजोगा आहे.