Breaking News

पाच तालुक्यातील 17 चो-या उघडकीस, आरोपीला रहिमतपूर पोलिसांकडून अटक

सातारा, दि. 28, ऑगस्ट - गेल्या तीन महिन्यांपासून रहिमतपूर शहरासह पाच तालुक्यातील पोलीसांची झोप उडवणारा दुर्गळवाडी (ता.कोरेगाव) येथील सराईत  चोरटा राहुल चांगदेव यादव (वय 23) या आरोपीला रहिमतपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कमेसह पन्नास हजार रुपयांसह दोन मोटार सायकली,  मोबाईल, लॅपटॉप आदि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती कोरेगाव पोलीस उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे, रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहा.  पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना प्रेरणा कट्टे म्हणाल्या, संशयित आरोपीने गेल्या तीन महिन्यात कोरेगाव तालुक्यातील रकिबदारवाडी गावातील कृषीराज कृषीसेवा  केंद्र दुकान फोडून 19,200 रुपये, रहिमतपूर येथील बसस्थानका समोरील विपुल अ‍ॅग्रो एजन्सीज दुकानात 7,300 रुपये व श्री बालाजी मेडीकल मधून 3,000  रुपये, वाठार (किरोली) येथील एका रात्रीत अमित ट्रेडर्स, अंबामाता स्वीट मार्ट, हॉटेल व्यंकटेश, अंबामाता हार्डवेअर या चार दुकानातून 13,400 रुपयांचा रोख  रक्कमेसह मुद्देमाल लंपास केला होता. शिरंबे येथून महालक्ष्मी अ‍ॅग्रो एजन्सीजमधून 11,880 रुपये लंपास केले.
खटाव तालुक्यातील औंध येथील शफीक आदम शेख यांची मोटार सायकल क्र. एम.एच.03-7368, ही तीस हजार रुपये किमतीची दुचाकी व दत्त चौकातील  राजपुरोहित स्वीट मार्टमधून 2,700 रुपये, पुसेसावळी येथील समर्थ किराणा स्टोअर्समधून 5,000 रक्कमसह मुद्देमाल लंपास केला होता. वडूज येथील शिव  ट्रेडर्समधून तीस हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप व श्री कृषीसेवा दुकानातून दोन हजार रुपये किमतीचा रिलायन्स जियो कंपनीचा राऊटर चोरुन नेला होता.